साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
सातारा, 27 एप्रिल: सध्याच्या तरुणाईत ऑनलाईन गेमची मोठी क्रेझ आहे. त्यातच क्रिकेटचा महाकुंभ मानली जाणारी आयपीएल स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे अनेकजण क्रिकेटशी संबंधित ऑनलाईन गेम खेळताना दिसतात. सातारा जिल्ह्यातील एका तरुणाचं याच ऑनलाईन गेममुळं नशीब पालटलं आहे. कराडच्या सागर यादव या शेतकरी पुत्रानं ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन गेममध्ये टीम लावली आणि काही तासात तो करोडपती झाला आहे. सागरने तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे.
कालेटेकचा सागर करोडपती
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या कालेटेक या गावी सागर गणपतराव यादव हा युवक राहतो. सागर हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. गोव्यात काही वर्षे तो नोकरी देखील करत होता. तर सागरचे कुटूंब कालेटेक येथे शेती करते. सागरला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड आहे. तर क्रिकेट बघत असताना तो नकळत महेंद्रसिंग धोनीचा जबरा फॅन बनून गेला. दरम्यान त्याच्या क्रिकेट वेडामुळेच गेल्या काही वर्षांपासून तो ड्रीम इलेव्हनचा ऑनलाईन गेम देखील खेळू लागला होता. आता याच गेममुळे तो करोडपती झाला आहे.
कसे मिळाले बक्षीस ?
सध्या आयपीएलचा सिझन सुरू आहे. रोज नवनवीन मॅच होत आहेत. या आयपीएल मधील विविध खेळाडूंचा अभ्यास करत सागर ड्रीम इलेव्हनवर टीम बनवायचा. प्रयत्न करूनही कित्येक वेळा त्याला अपयशच येत राहिले. मात्र अखेर सागरच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्याने निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि त्याने तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे बक्षीसही जिंकले.
सागरला किती पैसे मिळणार?
ऑनलाईन गेम्सवरुन मिळणाऱ्या बक्षिसावर 30 टक्के कर सरकारला द्यावा लागतो. त्यामुळे सागरला बक्षीस म्हणून 1 कोटी 20 लाख रुपये मिळाले असले तरी त्यातून 36 लाख कर सरकारला जाणार आहे. त्यामुळे 84 लाख रुपये सागरच्या खात्यावर जमा झाले आहेत.
Satara News : जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं बोलू लागले जपानी, पाहा कशी झाली जादू, Video
स्वतःची आणि कुटुंबाची स्वप्ने साकारणार
ऑनलाईन गेम खेळत मिळालेल्या या इतक्या मोठ्या रकमेच्या बक्षिसामुळे सागरच्या घरचे सदस्य भारावून गेले आहेत. तर त्याचा मित्र परिवार आणि परिचयाच्या मंडळींनी देखील सागरच्या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. योग्य अभ्यास करुन ऑनलाईन गेम खेळल्यामुळेच हे यश मिळाले आहे. त्यामुळे मिळालेल्या बक्षिसाच्या पैशातून मी माझे स्वप्न साकार करणार आहे. माझ्या हॉटेल व्यवसायाचे काम सुरु आहे, त्यालाही यामुळे हातभार लागणार आहे. तसेच माझ्या परिवारातील सदस्यांची देखील अनेक स्वप्नं मी पूर्ण करणार आहे, असे सागरने सांगितले.
सूचना : ड्रीम 11 हा ऑनलाईन गेमिंगचा प्रकार आहे. या खेळामुळे व्यसन लागू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.