धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 23 एप्रिल : मंत्रमुग्ध करून टाकणारी निसर्गाच्या सौंदर्याची उधळण, एकापेक्षा एक चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची रेलचेल आणि लोककलेचा अभिजात वारसा म्हणजे कोकण. कोकणातील विविध खाद्य संस्कृती, लोककला संस्कृती, पर्यटन संस्कृती अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे.
कुठे अनुभवणार कोकण?
तुमच्या शहरातून (मुंबई)
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील पालिकेच्या मैदानावर कोकणजत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. अस्तित्व ट्रस्टने आयोजित केलेल्या या महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. रविवार 23 एप्रिल रात्री 10 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात सर्वांना नि:शुल्क प्रवेश आहे. कोकणाची स्पेशालिटी असणारे खटखटे लाडू, ओले काजू, लाकडी खेळणी, रुचकर शाकाहारी, मांसाहारी पदार्थ, लाकडी दागिने अशा विविध गोष्टी या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोकणातील पदार्थ चाखण्यासाठी फूड स्टॉलवर दर्दी खवय्यांनी तुडुंब गर्दी होतीय. बच्चे कंपनीसाठी टी शर्ट पेंटिग वर्कशॉप घेण्यात आले होते. छोट्या दोस्तांनी आणि त्यांच्या पालकांनी त्याला उत्साहानं प्रतिसाद दिला. त्याचबरोबर कोकणी संस्कृतीचं वैशिष्ट्य असलेल्या दशावतारानं या ठिकाणी संध्याकाळ चांगलीच रंगली. कोकणी लोककलेचा हा प्रबोधनपर प्रकार पहायला वेगवेगळ्या भागातील मुंबईकर इथं उपस्थित होते. या मजमस्तीसोबतच प्लॅस्टिक कलेक्शन ड्राईव्ह आयोजित करुन, अस्तित्व ट्रस्टनं सामाजिक भानही जपलं आहे.
कोकणाचे लाडके दैवत असणार्या बाप्पाच्या मुर्तींच्या वर्कशॉप आणि संध्याकाळी रंगणाऱ्या ‘शक्ती तुरा’ या पारंपारिक कोकणी जुगलबंदीचं सर्वांन खास आकर्षण आहे. ‘कोकण जत्रा याचे हे दुसरे वर्ष असून संकल्पना अशी आहे की कोकणातील लघुउद्योजक आहेत त्यांना एक मंच मिळावा. कोकणातील संस्कृती मुंबईकरांना कळावी. यासाठी कोकणातील प्रसिद्ध गोष्टींचे स्टॉल लावण्यात येतात.’
मुंबईच्या उन्हाळ्यात पेंग्विनची कशी घेतली जातेय काळजी? पाहा Video
‘दशावतार, शक्तीतुरा, कोळी नृत्य यासारख्या परंपरा आम्ही मुंबईकरांसमोर सादर करतो. या ठिकाणी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले आहेत. कोकणातील खाद्य संस्कृती, दागिने परंपरा, वेशभूषा, इतिहास, कोकणातील पर्यटन यासारख्या गोष्टी अनुभवायला मिळतील. तेव्हा या कार्यक्रमांची मजा अनुभवायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्की भेट द्यायला हवी,’ असं आवाहन आयोजक सुनीता वाडकर यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.