प्रमोद पाटील, प्रतिनिधी
नवी मुंबई, 24 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सुरुवातीला काहीसा अडखळलेला विरोधीपक्ष आता आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वीच माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. खारघर दुर्घटनेत जो आकडा सांगितला जातोय त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्याची शंका बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला 14 अल्टीमेटम दिला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
..तर आम्ही कोर्टात जाणार : अंबादास दानवे
खारघर दुर्घटनेप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन आज नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. जर पोलिसांनी येत्या 14 दिवसात आम्ही दिलेल्या निवेदनावर योग्य कारवाई न केल्यास न्यायालयात जाऊन मृत श्री सेवकांना न्याय देणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची चौकशी करुन आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सदर कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपण दिलेल्या परवानगीचे काटेकोर पालन केले का? केले नसल्यास आपण काय कार्यवाही केली? आपण सदर घटनेसंदर्भात आतापर्यंत किमान अपमृत्युचा गुन्हा दाखल करून चौकशी केली का? सदर घटने संदर्भात क्षेत्राचे पोलीस उपआयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केली असून, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? आदी प्रश्न त्या घटनेच्या तपासावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना विचारले. यावेळी शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर , उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, शहर प्रमुख विजय माने, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, नगरसेवक काशिनाथ पवार, नगरसेवक मनोज हळदणकर, जिल्हा उपसंघटक (महिला) उषा रेनके, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वाचा – उद्धवसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी पतीचा जीव गेला, पण शिंदेंनी.. शिवसैनिकाची पत्नी झाली भावुक
घटनेची जबाबदारी स्विकारून सरकारने राजीनामा द्यावा : थोरात
खारघर घटनेत मृतांचा आकडा मोठा असण्याची शंका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले. मग बसण्यासाठी सावलीची व्यवस्था का केली नाही. मृतांच्या पोटात अन्न आणी पाणी नव्हतं. या घटनेला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. याची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या घटनेच्या चर्चेसाठी दोन दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात यावे, अशा मागण्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.