एमआयएमकडून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेनेला आलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, आता खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 मध्ये झालेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे. जलील यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जलील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले की, ‘2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मला सत्तार यांची मोठी मदत मिळाली. त्यामुळे मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे.’ शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांची मदत मला मिळाली आणि माझ्या विजयी होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राजकारणात अब्दुल सत्तार यांची कृपा झाली तर त्या व्यक्तीचं भाग्य उजळतं आणि ते जर नाराज झाले तर त्या व्यक्तीची अधोगती सुरू होते. आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी इम्तियाज जलील यांच्यासोबत असलेली मैत्री घट्ट आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत जलील यांनी शिवसेनाचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता.
अन्याय-अत्याचार वाढल्यानेच कोरोना आला –
देशासह जगाची चिंता वाढवणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि अभ्यासक प्रयत्न करत आहेत. तर कोरोना आला कसा याची अधिकृत पुष्टी अजूनही होऊ शकली नाही. असे असतानाच ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने मात्र अजबच दावा केला आहे. सर्वत्र अन्याय-अत्याचार वाढल्यानेच कोरोना आला असल्याचा दावा राज्य महसूलमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.