प्रमोद पाटील, प्रतिनिधी
नवी मुंबई, 19 मे : नवी मुंबईचे भाजपा नेते गणेश नाईक यांच्या महिला प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं बलात्काराचे आरोप मागे घेतले. दीपा चव्हाण यांनी आमदार गणेश नाईक यांच्याबाबत बलात्काराची केलेली तक्रार मागे घेणारे पत्र नेरूळ पोलीस ठाण्यात दिले होते. या पत्रात आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी तक्रार करण्यास भाग पाडले, त्यासाठी मला वेगवेगळी आमिषे दिल्याचा उल्लेख आरोप केला होता. यावर आता विजय चौगुले यांनी महिलेची ऑडिओ क्लिप समोर आणली आहे.
काय आहे प्रकरण?
तुमच्या शहरातून (मुंबई)
दीपा चव्हाण या महिलेने गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करत त्यांच्यापासून आपल्याला मुलगा असल्याचे सांगून कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, ज्या पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली होती, त्याच पोलीस ठाण्यात तक्रार मागे घेण्यासाठी अर्ज केला असून, आपल्याला आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी तक्रार करण्यास भाग पाडले, त्यासाठी मला वेगवेगळी आमिषे दिल्याचा उल्लेख केला. आता त्या पत्रावर विजय चौगुले यांनी त्या महिलेचा फोन आला होता आणि तो अर्ज कुणी आणि कशासाठी मागे घ्यायला लावले, याचा खुलासा करताना महिलेशी झालेले संभाषण ऐकवले. त्यात महिला आपल्याला पैशांची ऑफर दिली असल्याचे सांगून जर दोघांची नावे टाकलीस तर तुला सर्व दिले जाईल असे बोलल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता लेटर लिहायला नक्की सांगितले कुणी आणि का सांगितले? असा सवाल उपस्थित होत आहे.
हे रेकॉर्डिग आपण उपायुक्त यांना देणार असून याची सखोल चौकशी व्हावी आणि सदर महिलेला पोलीस संरक्षण द्यावे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे यावेळी विजय चौगुले यांनी सांगितले. त्यामुळे आपण हे सर्व प्रकरण कोर्टात घेऊन जाणार असून, याचा खुलासा करणार असल्याचेही चौगुले यांनी सांगितले.
वाचा – लग्न मंडपातूनच नवरदेवाला पोलिसांनी नेलं जेलमध्ये, कारण ऐकून सर्वानाच बसला धक्का
दीपा चव्हाण यांची प्रतिक्रिया
नेरूळ पोलीस ठाण्यात अर्ज आपणच दिला. मात्र, त्यात दोघांची नावे आहेत यावर बोलणे टाळले. विजय चौगुले यांनी जी रेकॉर्डिंग ऐकवली. यावर मला काहीच बोलायचे नाही. योग्य वेळी त्याचा खुलासा होईल. मात्र, आपण मंदा म्हात्रे आणि विजय चौगुले यांच्याकडे मदतीसाठी गेलो होतो. याचा फायदा राजकारणासाठी होत आहे. 50 लाख मिळाले म्हणून आपण त्यांची नावे टाकली यावर चव्हाण यांनी बोलताना मला कोणतेही पैसे आले नाहीत. आपण माझे बँक खाते तपासू शकता तर आपल्याला हे प्रकरण वाढवायचे नाही. माझा गणेश नाईक यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. हे सगळे लवकरच संपून जाईल माझी कोणतीही तक्रार नसल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. तर पुढे हे प्रकरण कुणीही वाढवू नये असेही चव्हाण म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.