नवी दिल्ली 29 एप्रिल : दोस्त-दोस्त ना रहा, प्यार-प्यार ना रहा! हे प्रसिद्ध गाणं तुम्ही ऐकलं असेलच. आजच्या काळात अनेकदा हे खरं होताना दिसतं. कारण लोक पूर्वी जशी मैत्री जपत असत तशी आता ती निभावत नाहीत. आता मित्रही स्वार्थी होतात आणि आपलं काम करून घेण्यासाठी काहीही करायला तयार होतात. अलीकडेच थायलंडमधील एका महिलेनं हे खरं असल्याचं सिद्ध केलं. तिने आपल्याच मित्रांना क्रूरपणे ठार मारलं आणि या खुनांचं कारणही धक्कादायक आहे.
पत्नीचे हात कापले, डोकंही धडावेगळं केलं अन् मग..; पतीची क्रूरता वाचूनच उडेल थरकाप
आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहोत ते अगदी ताजं आहे आणि एका महिलेशी संबंधित आहे. जिने आपल्याच मित्रांची हत्या केली. तिने एक-दोन नव्हे तर 12 मित्रांची हत्या केली आणि आता तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला सध्या गरोदर असून त्या अवस्थेत न्यायालयाच्या चकरा मारत आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, बँकॉकमध्ये 35 वर्षीय सरारत रंगसिवुथापूर्ण नावाच्या महिलेला पोलिसांनी सायनाइडच्या बाटलीसह अटक केली आहे. या महिलेवर 12 मित्रांची हत्या केल्याचा आरोप आहे. ताजी घटना गेल्या 14 एप्रिलची आहे. रातचाबुरी प्रांतातून सिरीपोर्न खानवोंग नावाच्या 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. हृदयविकाराच्या झटक्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि पोस्टमार्टम अहवालात त्याच्या शरीरात विष असल्याचं स्पष्ट झालं.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर असं कळालं की 33 ते 44 वयोगटातील आणखी काही लोकांचा अशाच प्रकारच्या विषामुळे नाखोन पॅथम, कंचनाबुरी, रतचाबुरी आणि फेतचाबुरी प्रांतांमध्ये मृत्यू झाला होता. या सर्व हत्या डिसेंबर 2020 ते एप्रिल 2023 दरम्यान घडल्या. मृतांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे, की त्यांच्याकडील सात लाख रुपयांचे दागिने आणि पैसे गायब आहेत. म्हणजेच पैशासाठी महिलेने तिच्या मित्रांची हत्या केली, असा अंदाज यावरून काढता येतो.
सरारत ही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची माजी पत्नी होती आणि अलीकडेच ती तिच्या मित्रासोबत फिरायला गेली असताना तिला अटक करण्यात आली होती. फिरायला गेलेले असतानाच तिचा मित्र अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं . पोलीस आता या महिलेवर चोरीचा गुन्हाही दाखल करणार आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. इतर मृत्यूंमध्येही महिलेचं नाव असल्यास तिला सीरियल किलर घोषित केलं जाईल. ही महिला गर्भवती असून तिने स्वत:ला निर्दोष सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.