नवी दिल्ली, 04 मे : कधी, कुठे, कसं, काय दुर्घटना घडेल आपण सांगू शकत नाही. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. टायरमध्ये हवा भरताना इतकी भयंकर दुर्घटना घडली आहे. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः धडकीच भरेल.
गाड्यांना किंवा पेट्रोलपंपवर आग लागल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण गाड्यांमध्ये पेट्रोल भरताना जितका धोका तितकाच टायरमध्ये हवा भरतानाही असू शकतो. हेच या व्हिडीतून दिसून येतं. त्यामुळे टायरमध्ये हवा भरतानाही काळजी घ्यायला हवी, थोडं जपूनच राहायला हवं.
एक मुलगा ट्रकच्या टायरमध्ये हवा भरतो आहे. तिथंच शेजारी एक पांढरा शर्ट घातलेली व्यक्ती उभी आहे. क्षणात काय होणार आहे, याची कल्पना दोघांनीही नाही. अचानक टायरमध्ये हवा भरणाऱ्या व्यक्तीजवळ स्फोट होतो आणि ती व्यक्ती हवेत उडून समोरच्या व्यक्तीवर आदळते. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे भयंकर दृश्य कैद झालं आहे.
VIDEO – जेसीबीतून आला ‘यमराज’, तर बोलेरोतून ‘देव’; चमत्कार पद्धतीने वाचला तरुणाचा जीव
हवा भरत असताना पाईपमध्ये काही बिघाड होऊन पाईप टायरमधून बाहेर आला. अचानक झालेल्या या दबावामुळे टायर हवेत उडाला. सुरुवातीला टायर फुगवणारी व्यक्ती आणि नंतर जवळ उभी असलेली व्यक्ती दोघांनाही याचा फटका बसला.
टायरचा ब्लास्ट होण्याच्या अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. दरम्यान टायरची काळजी कशी घ्यायची ते पाहुयात.
थ्रेड्सची तपासणी : टायरमध्ये नेहमी 3 मिमी थ्रेड्स असणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर टायरमध्ये बनवलेल्या पट्ट्यांची खोली 3 मिमी असणं आवश्यक आहे. त्यामुळे गाडीची रस्त्यावरची ग्रिप कायम राहते. यापेक्षा कमी ग्रिप असल्यास टायर पंक्चर होण्याचा, फुटण्याचा किंवा घसरण्याचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे 3 मिमीपेक्षा कमी ग्रिप असल्यास टायर तात्काळ बदला.
टायरमधली हवा : कारच्या टायरमधल्या हवेचा दाब नेहमी योग्य असावा. उन्हाळ्यात टायरमधली हवा 32 पीएस आणि हिवाळ्यात 35 पीएस ठेवा. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने वाहनांच्या टायरमध्ये हवेचा दाब वाढतो. त्याच वेळी हिवाळ्यात हा दाब कमी राहतो. टायर्समध्ये योग्य दाबाने हवा असल्यास तुमच्या वाहनाचे टायर कमी घसरतील आणि पंक्चर होण्याचा धोका कमी होईल.
अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग : कार व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग वेळोवेळी करा. तो कालावधी साधारणपणे दर 5 हजार किलोमीटर्सचा असावा. खराब रस्त्यांवर गाडी जास्त चालवत असाल तर 3 हजार किलोमीटरनंतर व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग करून घ्या. कारण खराब व्हील अलाइनमेंट किंवा बॅलन्सिंगमुळे टायर्स जास्त झिजतातच, शिवाय ते कमी-जास्त प्रमाणात झिजतात. त्यामुळे गाडीच्या कार्यक्षमतेत फरक पडण्याबरोबरच टायर्सचं आयुष्य कमी होतं.
कार चालकाला डुलकी लागली अन् घडलं भयंकर, अंगावर काटा आणणारे भीषण अपघाताचे PHOTO
ट्यूब टाकू नका : अनेक वेळा टायर नवीन असूनही साइड कट किंवा थ्रेड कटसारख्या समस्यांमुळे पूर्णपणे खराब होतो. तेव्हा पंक्चर काढणाऱ्या व्यक्ती ट्यूबलेस टायरमध्ये ट्यूब टाकण्याचा सल्ला देतात; पण तसं अजिबात करू नका. कारण तसं केल्याने त्या एका टायरचं वजन वाढतं आणि वाहनाची अलाइनमेंट बिघडते. शिवाय बाकीच्या टायर्सची लवकर झीज होईल. त्यामुळे अशा स्थितीत फक्त खराब झालेला टायर बदलून टाका.
टायरचं रोटेशन करणं फायद्याचं : टायरचं पुढे-मागे रोटेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण गाडीचे इंजिन पुढच्या बाजूला असल्यामुळे आणि बहुतेकशा गाड्यांचं फ्रंट व्हील ड्राइव्ह असल्यामुळे गाडीच्या पुढच्या टायर्सना सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ते लवकर झिजतात; पण टायर्सचं रोटेशन केल्याने म्हणजेच काही कालावधीने पुढचे टायर्स मागे व मागचे टायर्स पुढे टाकल्याने ते एकसारख्या प्रमाणातच झिजतील. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढेल. यामुळे गाडीची अलाइनमेंटसुद्धा व्यवस्थित राहते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.