शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झांशी, 18 मे : सध्या लग्नाचा हंगाम आहे, त्यामुळे अनेक इच्छुक तरुण तरुणी लग्नबेडीत अडकत आहे. पण, देशाच्या एका कोपऱ्यामधील या गावात तरुणाचे लग्नच होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कुणीच लग्नबेडीत अडकलं नाही.
देशाला स्वातंत्र मिळून 76 वर्षं झाली आहे. पण झांशीमधील कटेरा तालुक्यातील पुरेना गावात अजूनही वीज पुरवठा होत नसल्याची विदारक परिस्थिती आहे. या गावात वीज पुरवठा होत नसल्यामुळे गावात तरुणांचे लग्न होत नसल्याची बाब समोर आली आहे. घरात वीजच नसेल तर कुणीच या गावात मुलगी देत नाही.
वीज पुरवठाच नसल्यामुळे या गावात पाणी पुरवठाही वेळेवर होत नाही. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंत पायपीट करावी लागते. ‘गावात वीज नाही, त्यामुळे पाणी येत नाही. एवढंच नाहीतर आमच्या गावात दररोज लागणाऱ्या वस्तू सुद्धा मिळत नाही. आज सुद्धा आम्ही घरात दिवा लावून राहतो. आमच्या घरात काय गावात सुद्धा कुणी इलेक्ट्रिक साहित्य वापरत नाही. सरकारने रॉकेल बंद केलंआहे. त्यामुळे आम्हाला आता डिझेलवर दिवे लावावे लागतात. कधी कधी खाण्याचे तेल वापरून आम्ही दिवे लावतो’, अशी व्यथाच पुरैना गावातील महिला हिराबाईने मांडली.
या गावात वीज पुरवठा नसल्यामुळे पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे महिलांचा अर्धा दिवस हा पाणी आणण्यात जातो. संध्याकाळी 5 वाजेनंतर गावात काळोख होतो. गावात वीज आणि पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गावातील तरुणांना कुणी मुलगी देत नाही. जवळचे नातेवाईक जरी असले तरीही ते नातेसंबंध जुळवण्यासाठी नकार देतात. गावात काही जण मुलीचं स्थळ घेऊन येतात पण गावातली भीषण परिस्थिती पाहिल्यावर स्पष्ट शब्दात नकार देतात. तर दुसरीकडे, गावात वीज आणि पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच या समस्येवर तोडगा काढला जाईल, असं गावातील सरपंचांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.