मुंबई, 25 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी 35 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 55 धावांनी विजय मिळवला असून यासह आयपीएल 2023 मध्ये पाचवा विजय आपल्या नावावर केला आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातकडून शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा हे दोघे मैदानात उतरले. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने 56, हार्दिक पांड्या 13, विजय शंकर 19, डेविड मिलर 46, अभिनव मनोहरने 42 तर राहुल तेवाटियाने 20 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावलाने 2 विकेट्स तर अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स देऊन 207 धावा केल्या तर मुंबईला विजयासाठी 208 धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सकडून ईशान शर्माने 13, कॅमेरन ग्रीनने ३३, सूर्यकुमार यादवने 23, नेहाला वधेराने 40, पीयूष चावलाने 18 तर अर्जुन तेंडुलकरने 13धावा केल्या. उर्वरित कोणत्याही फलंदाजाला मुंबईसाठी दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.
गुजरात टायटन्सकडून नूर अहमदने 3, मोहित शर्मा आणि रशीद खानने 2 तर हार्दिक पंड्याने 1 विकेट घेतली. या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.