नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 21 एप्रिल : काळ पुरुषाच्या कुंडली मधील पहिली रास म्हणून मंगळ ग्रहाची मेष रास मानली जाते. या राशीमध्ये येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाच्या ग्रहांची युती होणार आहे. त्यातल्या काही महत्त्वाच्या ग्रहांची युती म्हणजे सूर्य आणि बुध यांची बुध आदित्य योग ही युती आहे. सूर्य आणि गुरु यांची युती होत आहे. बुध आणि गुरू यांची युती होणार असून गुरु आणि राहूची एक अशुभ युती देखील यावेळी मेष राशीमध्ये होणार आहे. मेष राशीमध्ये होणाऱ्या गुरु आणि राहूची चांडाळ योगाची युती याचे परिणाम काय होतील याबाबत पुण्यातील ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी माहिती दिली आहे.
काय होतील परिणाम?
तुमच्या शहरातून (पुणे)
ही युती तब्बल सहा महिने असणार आहे. गुरु ग्रह हा 22 एप्रिल रोजी आपल्या स्वराशी मीन मधून मंगळाच्या मेष राशीमध्ये प्रेवश करत आहे आणि त्यानंतर काही तासातच गुरुची राहू सोबत युती होणार आहे. गुरु राहूची युती म्हणजे गुरुचे चांगले कारकत्व राहूमुळे बिघडले जाते. यामुळे या युतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे, व्यवसायाचे किंवा नातेसंबंधाचे व्यवहार करू नये. यावेळी आपण कोणत्याही कागतपत्रावरती सह्या करताना जपून कराव्या. तसेच या कालावधीमध्ये विवाहबाह्य संबंध वाढीस लागण्याची शक्यता जास्त असते. याकडे देखील आपण लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या बिजनेस पार्टनरकडून तसेच आपल्या आयुष्याच्या जोडीदाराकडून देखील या कालावधीमध्ये आपली फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते असं ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे सांगतात.
कोणते उपाय या कालावधीमध्ये करावे
या कालावधीमध्ये गुरुवारचे उपास धरावे. तसेच सोमवारी शंकराला काळे पांढरे तीळ आणि दुधाचा अभिषेक करावा. गुरु महाराजांचा संपूर्ण वर्षभरामध्ये 19 हजाराचा मंत्र जप करावा किंवा आपल्या आंघोळीच्या रोजच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकावी. यामुळे आपले गुरुबळ वाढीस लागून राहूच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळू शकेल, असंही जितेंद्र गलांडे सांगतात.
Akshay Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला कधी खरेदी करावं सोनं? पाहा पूजेचा आणि खरेदीचा मुहूर्त Video
कोणता कालखंड गुरु राहू युतीचा वाईट कालखंड
गुरु राहुची युती जरी सहा महिने असली तरी 10 मे ते 20 जून या कालावधीमध्ये या युतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येईल. या प्रभावांमध्ये मानसिक रुग्णांमध्ये वाढ होईल. तसेच या कालावधीमध्ये देशामध्ये देखील मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. तसेच वैयक्तिक पातळीवरती लोकांच्या फसवणुकी होण्याची शक्यता आहे. यामुळे कोणतेही व्यवहार करण्यासाठी आधी विचार करावा तसेच जर खरंच महत्त्वाचे व्यवहार असतील तर ते 20 जून नंतरच कोणत्याही कागदपत्रावरती सही करावी. जमीन जुमला अथवा कोणत्याही व्यवहारांच्यासाठी हा कालखंड अतिशय वाईट कालखंड असा मानला गेलेला आहे अशी माहिती जितेंद्र गलांडे यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.