कॉम्रेड नामदेवराव शिवराम गोडसे यांचे नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. नाशिक जिल्ह्यातील संसारी गावातील स्वातंत्र्यसैनिक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व समाजकारणात नेहमी अग्रेसर असलेल्या नामदेवराव गोडसे यांनी गोवा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्याचबरोबर ते इगतपुरी मधील पहिले आमदार कॉम्रेड पूजांबाबा गोवर्धने, माजी आमदार दिवंगत कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड जेष्ठ नेते एस. ए. डांगे , कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर विविध शेतकरी आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. याकरिता त्यांनी अनेकवेळा तुरुंगवासही भोगला होता. कॉम्रेड नामदेवराव हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असत. कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ते भारतभर विविध कार्यात सहभागी असत. दुर्दैवी योगायोग म्हणजे नुकतेचच ज्येष्ठ समाजकारणी एन. डी. पाटील यांचे यांचे निधन झाले आणि त्यांच्या मागे दुसऱ्या दिवशी त्यांच्या विचाराचे सहकारी नामदेवराव यांनीदेखील या जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर श्रमिकांच्या विचारांचा वारसा, शेतकरी कामगार श्रमिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणे, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार, भारतीय संविधानाची मूल्य रुजवण्यासाठी काम करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!
विजय वडेट्टीवार