चंद्रपूर, ता.१२
आगामी खरीप हंगामात सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी गोसीखुर्द जलसिंचन प्रकल्पाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बंदिस्त जलवाहिन्यांची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी रवि भवन नागपूर येथे आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कालवे आणि बंदिस्त जलवाहिन्यांची कामे अधिक गतीने व दर्जेदार होणे आवश्यक आहे. कामाचा दर्जा चांगला राहिल्यास प्रत्यक्ष सिंचन सुरु झाल्यानंतर अडथळे निर्माण होणार नाहीत. बंदिस्त जलवाहिन्यांच्या कामासाठी शेतीमध्ये करण्यात आलेल्या खोदकामाची बांधबंदिस्ती करून द्यावी. या कामांविषयी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेवून या तक्रारींचे निराकरण करावे.
कालव्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांची व त्यांना जोडणाऱ्या जोडरस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 24 गावांतील शेतीसाठी गोसीखुर्द जलसिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी मेंढकी आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेस निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव करणे तसेच आसोलामेंढा धरणाची उंची वाढविणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दीर्घ मुदतीच्या भाडे पट्ट्यावर आसोलामेंढा प्रकल्पातील जमीन पर्यटनासाठी देण्याच्या प्रस्ताव संदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील, संदीप हासे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.