दिल्ली, 14 एप्रिल : पश्चिम बंगालमधील हुगळी येथील चंदननगरचा रहिवासी असलेला अभिषेक पोरेल सध्या आयपीएलच्या मैदानावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. अभिषेक दिल्ली कॅपिटल्स टीमसाठी ऋषभ पंतच्या जागी विकेटकीपिंग करत आहे. मैदानात उतरल्यानंतर त्यानं आपल्या कौशल्यामुळे अनेकांना आश्चर्य व्यक्त करण्यास भाग पाडलं आहे. विशेषत: टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माचा कॅच घेतल्यानंतर क्रिकेट रसिकांनी अभिषेकचं फार कौतुक केलं आहे. अभिषेकला आता सर्वजण ‘चंदननगरचा स्पायडरमॅन’ म्हणून ओळखू लागले आहेत. मुलाला मिळालेल्या यशामुळे त्याचे कुटुंबीय सध्या अतिशय आनंदात आहेत.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बंगालचा विकेटकिपर असलेला रिद्धिमान साहा आता बंगालकडून खेळत नाही. तो आता आगरताळा टीमकडून खेळतो. त्याची जागा अभिषेक घेताना दिसत आहे. सध्या दिल्लीच्या टीममध्ये असलेल्या बंगालच्या या युवा क्रिकेटपटूनं मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार कामगिरी केली. त्यानं रोहित शर्माचा जबरदस्त कॅच घेऊन त्याची शानदार खेळी रोखली. अनेकांच्या मते, अभिषेक दिल्ली कॅपिटल्स टीमसाठी फुलटाईम विकेटकिपर होऊ शकतो.
IPL 2023 : पंचांनी मोडला नियम? गुजरातच्या चुकीकडे दुर्लक्ष, पंजाबला फटका; चाहत्यांचा आरोप
वयाच्या विशीमध्ये असलेला अभिषेक हुगळीतील चंदननगर येथील सर्कस मैदानाजवळील वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत राहतो. कनैलाल विद्यामंदिर शाळेत त्याचं शालेय शिक्षण झालं आहे. तो वयाच्या चौथ्या वर्षापासून विकेटकीपिंगचा सराव करत होता. शिवाय, तो चांगली बॅटिंगदेखील करू शकतो. 2019 च्या अंडर-19 क्रिकेट टीममध्ये त्याचा समावेश होता. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये त्याला चांगलं यश मिळालं. आयपीएल खेळणं हे अभिषेकचं स्वप्न होतं. अखेर त्याला दिल्लीच्या टीमकडून खेळण्याची संधी मिळाली.
अभिषेकचे वडील सोमनाथ पोरेल आपल्या मुलाच्या यशानं प्रभावित झाले. ते म्हणाले, “मी मुलाच्या यशामुळे आनंदी आहे. पण, ऋषभ पंतची जागा घेण्यासाठी त्याला अजून खूप सरावाची गरज आहे.” अभिषेकवर जेवढं जास्त दडपण येईल, तेवढा तो चांगला खेळेल, असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. बॅटिंगमध्येही अभिषेक योग्यता सिद्ध करेल, असा त्यांना विश्वास आहे.
पंचांच्या निर्णयावर बोलणं अश्विनला पडलं महागात, BCCIने केली कारवाई
सौरव गांगुलीनं दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये अभिषेकला संधी दिली. अभिषेकची नेट प्रॅक्टिस बघून गांगुली प्रभावित झाला. त्यानंतर पंतच्या जागी त्याला दिल्लीला बोलावण्यात आलं. अभिषेकनं गांगुलीला निराश केलं नाही. तो एकामागून एक मॅचमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.
मुलाच्या यशानं अभिषेकची आई अनिमा खूप आनंदी झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, “मी रोज रात्री माझ्या मुलाशी बोलते. तो काय खातो काय पितो? तो नीट झोपतोय की नाही, हे मी त्याला विचारते. मुलाच्या खेळासाठी आम्हाला लहानपणापासून खूप त्रास सहन करावा लागला आहे. पण, सर्वांत जास्त कष्ट अभिषेकनं स्वत: घेतले आहेत. त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. येत्या काही दिवसांत आमच्या मुलाला भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीमध्ये बघायचं आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.