मुंबई, 18 एप्रिल : मागच्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एवढच नाही तर अजितदादा राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत भाजपसोबत जातील, असं बोललं गेलं. सोमवारी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे होत्या, तिथेही अजित पवार गेले नाहीत, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. अखेर मीडियासमोर येत अजित पवारांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागाच्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला अजित पवार आले आहेत. या कार्यक्रमाला शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज सहभागी होत आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय म्हणाले अजित पवार?
गेल्या 2 दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना राज्यात पेव फुटलं होतं. अजित पवारांनी अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं ठणकावलंय. कारण नसताना काही लोकं गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जोपर्यंत जिवात जीव आहे, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार अशी ग्वाहीही अजित पवारांनी दिलीय. पक्ष सोडण्याच्या या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.
राष्ट्रवादी फुटण्याबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांचा अजित पवारांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये समाचार घेतला. महाविकास आघाडीतले काही नेते त्यांच्या पक्षाचं सोडून दुसऱ्या पक्षाचं कशाला बोलतात अशा शब्दात संजय राऊतांना फटकारलंय. तुमच्या पक्षाचं मुखपत्र आहे त्यातून पक्षाबद्दलच लिहा दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल लिहण्याची गरज नाही असंही अजित पवारांनी सुनावलं. राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रवक्तेपद घेऊ नका असंही अजित पवार म्हणालेत. आमचं वकीलपत्र घेण्याचं काही कारण नसल्याचंही त्यांनी राऊतांना फटकारलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.