मुंबई, 10 एप्रिल : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार इंग्लडमधून परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारकडे अहवाल सादर झाल्याची माहिती सुत्रांनी न्युज 18 लोकमतला दिली आहे. याआधीही छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार देशात आणण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज18 लोकमतला दिली होती.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत, त्यामुळे जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेली जगदंबा तलवार ही देशाची अस्मिता आहे. ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालिन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती. सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
आता ही तलवार परत आणण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचा सांस्कृतिक विभागाकडे संपूर्ण अहवाल/पत्रव्यवहार सादर झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जगदंबा तलवारीची लांबी 121 सेंटिमीटर आहे म्हणजेच ही तलवार जवळपास 4 फूट आहे. तलवारीच्या रत्नजडित मुठीवर संपूर्ण सोन्याचं काम आहे. तलवार दिसायला अत्यंत सुंदर असून वजनाने कमी आहे.
वाचा – शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील JPC मुळेच आज.. चव्हाणांनी करुन दिली आठवण
‘शिवाजी महाराज विजया दशमीच्या शस्त्रपुजेच्या दिवशी रत्नजडीत जगदंबा तलवारीची पूजा करायचे. ही तलवार इंग्रज घेऊन गेले आहेत. ऋषी सुनक पंतप्रधान झाले आहेत, ज्यांचा भारताशी संबंध आहे. मी केंद्र सरकारला विनंती केली आहे, तसंच मी सुनक यांच्याशीही संपर्क करणार आहे. आमच्या अस्मितेचं शूरतेचं प्रतिक ही जगदंबा तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने ही तलवार पावन झाली आहे. ही तलवार महाराष्ट्राला परत करावी, असं पत्र आम्ही केंद्राला पाठवलं आहे, तसंच ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही विनंती करत आहोत,’ असं सुधीर मुनगंटीवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.