आंध्र प्रदेशमध्ये सगळ्या मंत्रिमंडळानेच राजीनामा दिला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा बदल मानण्यात येत आहे. राज्यातल्या संपूर्ण कॅबिनेटने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यात 24 मंत्र्यांचा समावेश आहे. जगनमोहन रेड्डींनी संपूर्ण कॅबिनेटमध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. नव्या मंत्रिमंडळात फक्त एक किंवा दोन जुन्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. 2019च्या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर जगनमोहन रेड्डींनीच यासंदर्भातली घोषणा केली होती. जगनमोहन म्हणाले होते की, त्यांच्या अर्ध्या कार्यकाळातच नवीन टीमची नियुक्ती केली जाईल. मंत्रिमंडळातले हे फेरबदल 2021 च्या डिसेंबरमध्येच होणार होते. मात्र कोरोना संकटामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.
आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांनी सुरुवातीपासूनच अनेक महत्वाची कामे केली. विधानसभा निवडणुकीनंतर जगनमोहन यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे अशा भावना सध्या सर्वत्र उमटू लागल्या आहेत. मंत्रिमंडळात नेत्यांचा समावेश करताना त्यांनी हे मंत्रिमंडळ दोन ते अडीच वर्षांचेच असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार त्यांनी सध्याच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सर्वच मंत्र्याचे राजीनामे घेतले. त्यानुसार त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवत इतर आमदारांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे इतर मतदारसंघांनाही न्याय मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. खरतरं राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची विजयवाडा येथे राज भवनात त्यांनी भेट घेतली. मंत्रिमंडळ बदलाबाबत त्यांनी राज्यपालांना माहिती दिली होती. २६ जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील एका मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. प्रत्येक जाती , धर्म , प्रांत , धर्मातील स्त्री पुरुषांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. पक्षाला मागील निवडणुकीत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळाली आहे. तसच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला मोठा विजय मिळाला आहे.
महाराष्ट्राशी अनोखे नाते
जगनमोहन सरकारच्याने चांगल्या कामांची घोषणा आणि पूर्तता केली . तर महाराष्ट्राबरोबर अनोखे नाते जपले. जगनमोहन सरकारने दणक्यात सुरुवात करत राज्यातील आशा वर्कर्संच्या मानधनात घसघशीत वाढ केली . महाराष्ट्राला कोरोना काळात गरज असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशला मदत करण्याची विनंती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. यावर रेड्डी यांनीही ३०० व्हेंटीलेटर्स देण्याची घोषणा केली होती.
२०२१ मध्येही जेव्हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत असलेले देवस्थान म्हणजेच, तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या यादीत देशभरातील २४ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. यात, महाराष्ट्रातून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेश मधील राज ठाकरे
स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये डावलले जाते असे राज ठाकरे नेहमी म्हणत असतात. तेव्हा अनेकदा त्यांना उत्तर भारतीय विरोधी असेही म्हटले जाते. मात्र राज ठाकरेंची भूमिका आंध्र प्रदेशला पटल्याचे दिसून आले जेव्हा, जगनमोहन रेड्डीनी देखील स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचे ठरवले. आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील स्थानिक युवकांसाठी खासगी कारखाने आणि उद्योगांमध्ये ७५ % नोकरी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.
आणि आता पुन्हा एकदा त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिलला नव्या मंत्रिमंडळाची स्थापना केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात नवीन 26 जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाईल. प्रत्येक जात, क्षेत्र, धर्मातल्या महिला, पुरुषांना ही संधी दिली जाणार आहे. 2019 मध्ये मंत्र्यांना जबाबदारी सोपवते वेळीच अडीच वर्षासाठी त्यांना मंत्रिपद दिलं जात आहे हे सांगितल्याचं, राजीनामा दिल्यानंतर मंत्र्यांनी सांगितलं.
2019 मध्ये जगनमोहन रेड्डींनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वसमावेशक मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. आता नव्या मंत्रिमंडळातही हेच समीकरण पाहायला मिळू शकतं. जुन्या मंत्रिमंडळात जगनमोहन रेड्डींनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि मुस्लिम समुदायातून पाच उपमुख्यमंत्र्यांची निवड केली होती. कॅबिनेटमध्ये तीन महिलांचाही समावेश होता.