मुंबई, 21 मे : आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार या बाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत ठाकरे गटाकडून वीस जागांवर दावा करण्यात आला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी आम्ही 18 जागा लढवणार असून, दादरा नगर हवेलीचा एक असे आमचे एकूण 19 खासदार संसदेत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तिव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यानंतरही राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
तुमच्या शहरातून (मुंबई)
मधल्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये देखील कोण लहाण भाऊ? कोण मोठा भाऊ हा विषय आला होता. प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो.आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही भूमिका मांडावी लागते. लोकसभेच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. विधानसभेला अजून वेळ आहे. मागच्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे 19 खासदार होते. आमचा लोकसभेतला 19 चा आकडा कायम राहील, कदाचित वाढेल सुद्धा त्यात कोणाला त्रास व्हायचं काही कारण नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.
समितीची स्थापना
दरम्यान लोकसभेसाठी कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा हे ठरवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एका समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. या समितीमध्ये तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. ही समिती जागा वाटपाचा निर्णय घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.