भाजपचं स्थापनेनंतरचं पहिलं अधिवेशन मुंबईत झालं, तेव्हाच्या अध्यक्षीय भाषणातलं अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य खुप गाजलं होतं. ‘ अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा ‘ आज त्यांचं ते वाक्य सत्यात उतरताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना दिसत आहे. भारताच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष (भाजप) हा जगभरातील राजकारणाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय आहे. लोकसभेत 2 जागांवरून 303 जागांपर्यंत भाजपचा हा प्रवास खूप काही सांगून जातो. अटल-अडवाणी जोडीपासून मोदी-शहा जोडीपर्यंत प्रत्येक दशकात पक्षाने नवनवीन यश संपादित केले आहे. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली असली तरी त्याचा इतिहास भारतीय जनसंघाशी जोडलेला आहे.आणीबाणीमुळे इंदिरा गांधींविरोधातील संताप 1977 साली मतपेटीतून बाहेर आला आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनता पार्टीच्या रुपात पहिलं बिगर-काँग्रेस सरकार केंद्रात सत्तेत आलं. पण हे यश फार काळ टिकलं नाही. तीनच वर्षात अंतर्गत धुसफुशीतून केंद्रातलं हे सरकार कोसळलं आणि जनता पार्टीचे तुकडे झाले. त्यातलाच एक तुकडा म्हणजे, आजची भारतीय जनता पार्टी, अर्थात ‘भाजप.’
पक्ष स्थापनेनंतर भाजपनं लोकसभेची पहिली निवडणूक 1984 सालीच लढली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची ही पहिली निवडणूक होती. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट होती आणि तेच निकालात दिसून आलं. भाजपनं सर्व 543 जागा लढवल्या होत्या. मात्र, या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. गुजरातमधील मेहसानामधून ए. के. पटेल आणि तेलंगणातील (तेव्हाचा आंध्र प्रदेश) हनामकोंडामधून चेंदुपटला जंगा रेड्डी हे विजयी झाले.1984 च्या निकालानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मार्च 1985 ला बैठक झाली. या बैठकीत वाजपेयी म्हणाले की, “पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेतो. पक्षा निर्णय देईल, त्या शिक्षेचं पालन मी करेन.” या बैठकीत दोन प्रश्नांचं आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. एक म्हणजे, जनसंघाचं जनता पार्टीत विलीन करणं योग्य होतं का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, जनसंघाला पुनर्जीवित करायचं का? मात्र, ‘भाजप’ हे नाव आणि ‘कमळ’ हे चिन्ह एव्हाना लोकांपर्यंत पोहोचलं होतं. कार्यकर्त्यांनी ‘कमळा’चा प्रचार केला होता. त्यामुळे तिथून परत मागे फिरण्याचं धाडस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना होत नव्हतं.मग शेवटी वाजपेयींच्याच सूचनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीने एक समिती स्थापन केली. कृष्णलाल शर्मा हे या समितीचे प्रमुख होते. त्यांनी सर्व राज्यांच्या भाजप समित्यांकडून प्रतिक्रिया मागवल्या आणि तातडीने अहवाल सादर केला. याच अहवालात त्यांनी विचारधारेचं महत्व अधोरेखित केलं होतं. याच अहवालात पहिल्यांदा ‘पार्टी विथ डिफरन्स’ शब्द नमूद होता. पुढे भाजपची ओळख लोकांपर्यंत नेण्यात या शब्दाचा वारंवार वापर करण्यात आला. या अहवालानंतर भाजपमध्ये अंतर्गत बदल झाले, नव्या गोष्टी आणल्या गेल्या, त्यातीलच एक म्हणजे महिला मोर्चा, युवा मोर्चा इत्यादी गोष्टी. यातून समाजातील विशिष्ट वर्गाला भाजपनं अशा विविध मोर्चांच्या झेंड्यांखाली एकत्र आणण्यास सुरुवात केली.
याच काळात अनेक तरुण नेत्यांना भाजपनं जोडून घेतलं. त्यात व्यंकय्या नायडू, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, कालराज मिश्रा, कल्याण सिंग, ब्रह्म दत्त, के. एन. गोविंदाचार्य यांचा समावेश होता. आणि त्यातीलच एक नाव म्हणजे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी. 1984 च्या पराभवातून शिकून भाजपनं लोकसभा निवडणुकीत केवळ चढता आलेखच राखला. आकडेवारीवर नजर टाकल्यास ते प्रकर्षानं दिसूनही येतं.
1984 साली 2 जागा
1989 साली 85 जागा
1991 साली 120 जागा
1996 साली 161 जागा
1998 साली 182 जागा
1999 साली 182 जागा
2004 साली 138 जागा
2009 साली 116 जागा
2014 साली 282 जागा
2019 साली 303 जागा
भाजपनं 2 जागांपासून सुरुवात करून गेल्या 42 वर्षात 303 जागांवर मजल मारली आहे.
लोकसभेबरोबरचं आता राज्यसभेतही भाजपने इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच भाजपच्या राज्यसभेत 100 पेक्षा जास्त जागा झाल्या आहेत. अशी ही कामगिरी करणारा भाजप हा 1988 नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या फेरीनंतर भाजपचे राज्यसभेतील खासदार आता 101 झाले आहेत. राज्यसभेत भाजपने 100 चा आकडा पार केल्याने, यावर्षी ऑगस्टमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून विरोधक बाहेर फेकले गेले आहेत. 13 पैकी 4 जागांवर विजय मिळवत भाजपने हा पराक्रम गाजवला आहे. भाजपच्या आजच्या स्थापने दिवशी भाजप कोणती नवी रणनीती आखत पुढे प्रवास करत राहणार, भाजप यशाच्या शिखरावर जाताना अजून कोणते विक्रम करणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.