लखनऊ 17 एप्रिल : प्रेमात अनेकदा लोक आकंठ बुडतात आणि हे प्रेम मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. अशीच एक घटना नुकतीच उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये समोर आली आहे. यात प्रियकर आणि प्रेयसीने नस कापून घेतल्याची घटना घडली. इंजिनीअर प्रियकराला त्याच्या पदवीधर प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. मात्र, मुलीचं लग्न दुसरीकडे ठरवण्यात आलं होतं. यामुळे दोघांचीही मनं तुटली. एकत्र राहण्याचं वचन पूर्ण होत नसल्याचं पाहून दोघांनी एकत्र मरण्याचा प्रयत्न केला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
फिरोजाबादच्या सिरसागंज गांधी मंडईत राहणारा इंजिनियर एका मुलीच्या प्रेमात पडला होता. मुलगी बंगळुरूमध्ये काम करते, मात्र कोरोनाच्या काळात घरून काम सुरू होतं. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. दरम्यान, मुलीचं लग्न अन्यत्र निश्चित झालं.
प्रियकर-प्रेयसीला लग्न करायचं होतं, पण दोघांच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं. यामुळे प्रियकर-प्रेयसीने रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास शिकोहाबाद येथील बांके बिहारी हॉटेल गाठून खोली घेतली. शिकोहाबाद पोलीस ठाण्याचे प्रमुख हरवेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही पेपर कटिंग करण्याच्या चाकूने हाताच्या नसा कापल्या.
तरुणाने तर त्याच्या गळ्याची नसही कापली. शरीरातून रक्त वाहत असल्याचं पाहून मुलगा घाबरला. त्याने मित्र रिंकूला फोन करून सांगितलं, की मी चाकूने गळा चिरला आहे, पण मला मरायचं नाही. रिंकू तत्काळ हॉटेलमध्ये आला आणि मॅनेजरच्या मदतीने दोघांनाही शिकोहाबाद येथील शासकीय रुग्णालयात नेलं.
प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं. पोलीस अधीक्षक रणविजय सिंह यांनी सांगितलं की, नस कापण्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताना दोघांनी त्यांचं मूळ आधार कार्ड आणि खरं नाव दाखवलं आहे, सध्या या संदर्भात तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.