मुंबई, 9 एप्रिल : बीसीसीआयची रविवारी अपेक्स काऊन्सिल मीटिंग होणार आहे, या बैठकीमध्ये महिला टीमच्या हेड कोचच्या नियुक्तीवर चर्चा केली जाणार आहे. तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी सरकारकडून कर सवलत मिळावी, यावरही चर्चा होणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मीडिया राईट्स विकण्याच्या प्रक्रियेवरही विचार केला जाण्याची शक्यता आहे.
भारतीय महिला टीम दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हेड कोचशिवाय खेळली होती. रोमेश पवार यांना काढल्यानंतर महिला टीम हेड कोचशिवाय खेळत आहे. वर्ल्ड कपमध्ये बॅटिंग कोच ऋषिकेश कानेटकर यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिलमध्ये हेड कोचच्या नियुक्ती प्रक्रियेला हिरवा कंदील देण्यात येणार आहे.
अपेक्स काऊन्सिलच्या मान्यतेनंतर हेड कोच नियुक्तीसाठी अर्ज मागवले जातील. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. हरमनप्रीत कौरच्या टीमचा ऑस्ट्रेलियाने 5 रनने पराभव केला होता.
आयपीएल मीडिया राईट्स 48,390 कोटींना विकल्यानंतर बीसीसीआय आता 2023-2027 च्या भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मीडिया राईट्स विकण्याची प्रक्रिया सुरू करेल. 31 मार्चपर्यंत हे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे होते. स्टारने हे राईट्स 6,138.1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यावेळी आयपीएलप्रमाणेच या मीडिया राईट्समधूनही मोठी कमाई व्हायचा बीसीसीआयचा अंदाज आहे.
वनडे वर्ल्ड कपसाठी सरकारकडून कर सवलत मिळावी, यासाठीही बीसीसीआय प्रयत्न करणार आहे, त्यामुळे या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होईल. सरकार कराची रक्कम आयसीसीकडून वसूल करेल, पण आयसीसी हे पैसे बीसीसीआयच्या नफ्यातून घेईल, त्यामुळे बोर्डाचं मोठं नुकसान होऊ शकतं. यासाठीच बीसीसीआय सरकारसोबत चर्चा करून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.