मुंबई : ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात पर्यटकांना सोनेरी कोल्हे दिसले आहेत. सोनेरी कोल्हा हा मूळ भारतीय उपखंडातील प्राणी असून वन परिसंस्थेमध्ये त्याची खूप महत्त्वाची भूमिका आहे. तो विविध प्रकारचे लहान सस्तन प्राणी, पक्षी, मासे, ससे आदींसोबत फळेसुद्धा खातात. त्यातच आता ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात त्यांचं दर्शन झालंय.
शनिवारी (1 एप्रिल 2023) संध्याकाळी पर्यटकांच्या एका गटानं ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात दोन सोनेरी कोल्हे पाहिले. याबाबत वन्यजीवप्रेमी कुणाल चौधरी यांनी सांगितलं की, ‘मी भांडूप पंपिंग स्टेशनवर फ्लेमिंगो बोट राइड घेण्यासाठी आलो होतो. माझ्यासोबत बोटीत आणखी पाच ते सहा लोक होते, त्यात माझा मित्र आणि तज्ज्ञ पक्षी मार्गदर्शक शाहिद बामणे यांचाही समावेश होता.
आमची बोट फ्लेमिंगोच्या जवळ येत असताना, शाहिदला खारफुटीच्या जंगलात दोन कोल्हे शेजारी शेजारी बसलेले दिसले. या प्राण्याचं नैसर्गिकरित्या आम्हाला दर्शन झालं. कारण त्यांची निवासस्थाने अत्यंत दुर्मिळ आहेत. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, आम्ही त्यांना किमान पाच मिनिटे पाहू शकलो.
तुमच्या शहरातून (मुंबई)
तीन वर्षांपासून न चुकता रोज घरी येतो मोर, कशी झाली दोघांच्यात घट्ट मैत्री? पाहा VIDEO
शाहिद मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनसोबत बोट ऑपरेटर म्हणून काम करतात, व त्यांना या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीबद्दल उत्तम माहिती आहे. त्यांच्याशिवाय कोल्ह्यांचे हे दर्शन घडले नसते,’ असेही चौधरी म्हणाले.
भारतात 80 हजारांच्या आसपास संख्या
भारतामध्ये सोनेरी कोल्हे शिकार, वन्यजीव तस्करी, मानव-प्राणी संघर्ष आणि महामार्गावरील अपघातांचे वारंवार शिकार ठरतात. ही प्रजाती 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची II अंतर्गत संरक्षित आहे.
भारतामध्ये सोनेरी कोल्ह्यांची अंदाजे संख्या 80,000 आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, भांडुप पंपिंग स्टेशन, चारकोप, वर्सोवा, वसई, भाईंदर आणि घोडबंदर रोडचा काही भाग यासह मुंबई महानगर प्रदेशात खारफुटीचे मोठे जंगल आहे.
या ठिकाणी सोनेरी कोल्ह्यांचे अनेकवेळा दर्शन घडते. परंतु त्यांच्याबद्दल कोणताही अभ्यास केला गेला नाही. त्यामुळेच आता मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनने मुंबई आणि आसपासच्या खारफुटीच्या जंगलातील या प्रजातींच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी अभ्यास सुरू केलाय. या संशोधनामुळे सोनेरी कोल्ह्यांचे संवर्धनासाठी केवळ उत्तम धोरण तयार करण्यात मदत होणार नाही, तर त्यांच्याबद्दलचा डेटा संकलितसुद्धा होणार आहे.
बाजारातील आंब्याचा रस पित असाल सावधान! तज्ञांनी दिला हा महत्त्वाचा इशारा…
दरम्यान, या पूर्वी मानव-कोल्हा संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुलुंड आणि विक्रोळी येथील खारफुटीच्या जंगलाजवळ असलेल्या मानवी वस्तीतून कोल्ह्यांची सुटका केल्याचीही उदाहरणं आहेत. त्यामुळे मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनद्वारे करण्यात येणारा अभ्यास हा कोल्ह्यांचा आहार, त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांची माहिती आदींबाबत माहिती मिळविण्यासाठी उपयोगी ठरू शकेल.
खारफुटीच्या परिसंस्थेतल्या अन्नसाखळीचा सोनेरी कोल्हे हा महत्त्वाचा भाग आहेत. खारफुटी जंगलातल्या मांसभक्षक प्राण्यांमध्ये यांचा समावेश होतो. या अभ्यासामुळे सोनेरी कोल्ह्यांची परिसंस्था अधिक चांगल्या पद्धतीनं समोर येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.