ठाणे, 4 एप्रिल : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ठाण्यात जोरदार राडा झाला आहे. ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रोशनी शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या सर्व प्रकारानंतर शिवसेनेने (शिंदे गट) पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या देत रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर अखेर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेली टीका शिंदे गटाच्या चांगली जिव्हारी लागली. यानंतर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. म्हस्के म्हणाले, सिव्हिल हॅास्पिटल आणि संपदा हॅास्पिटलने दिलेल्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होतय का तिला मारहाण झाली नाहीये आणि ती गर्भवती नाही. त्यांनी पोलिसांवर देखील चुकीचे आरोप केलेत अपशब्द वापरलेत. खासदार राजन विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनाव करुन त्या महिलेला जबाब द्यायला सांगितले. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्तालयातून जाणार नाही. मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप केलेत, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे बोलले होते म्हणून त्यांना जेवण्याच्या ताटावरुन ताब्यात घेवून अटक केली होती. मग यांच्यावर पण कारवाई झालीच पाहिजे. उद्या जर आमच्या कार्यकर्त्यांचा बांध तुटला तर त्याला जबाबदार ठाकरे गट असेल असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे.
वाचा – नवनीत राणांचा एप्रिल महिन्यात दोनदा वाढदिवस? ठाकरे गटाच्या आरोपामुळे खळबळ
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर आक्षेपाहार्य पोस्ट लिहिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना पदाधिकारी बाळा गवस यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
काय म्हणाले होते ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ठाण्यातील मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. ठाण्यात रोशनी शिंदेंना मारहाण करण्यात आली. ठाण्यात महिला गुंडांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात मुख्यमंत्री आहेत की गुंडमंत्री असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.