कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर नव-नवीन विषयांवरील अनेक नाटके पाहायला मिळाली. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, सस्पेन्स, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. विजय केंकरे ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन रंगभूमीवर येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे दिसणार आहेत.
डॉ. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प आहे. या त्रिवेणी संगमामुळे ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रेक्षकांसाठी दर्जेदार मेजवानी असणार यात शंका नाही. मल्हार आणि रॉयल थिएटर निर्मित या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला होणार आहे.‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भित अर्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा… गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे.‘३८ कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये डॉ.गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत.
देवदत्त कामत या व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! ‘३८ कृष्ण व्हिला’ ह्या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला, सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव! या पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे.