मुंबई, 28 एप्रिल : आपल्या सर्वांना माहीत आहे की, मेंदू हा मुख्य अवयव नियंत्रक आहे. रोजच्या जीवनात शारीरिक आणि भावनिक गोष्टींचे नियंत्रण मेंदू करत असतो. मात्र मेंदूला जर कोणत्याही प्रकारे दुखापत झाली तर त्याचे जीवनावर आणि एकूण जगण्यावर गंभीर परिणाम होतात. डोक्याला किंवा मेंदूला दुखापत झाल्याने रोजच्या जगण्यावर कसा प्रतिकूल होतो हे काही उदाहरणांच्या माध्यमातून जाणून घेऊया. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्यानुसार मेंदुला दुखापत होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी हे माहिती असणं गरजेचं आहे.
मेंदुची दुखापत, त्याचे जीवनावर होणारे परिणाम आदिंविषयी बेंगळुरूतील इलेक्ट्रॉनिक सिटीमधील कावेरी हॉस्पिटलचे न्यूरोसर्जरी विभागाचे वरिष्ठ कन्सल्टंट डॉ. कृष्णा चैतन्य यांनी माहिती दिली आहे. “न्यूरोसर्जन म्हणून काम करताना या प्रवासात मी ब्रेन इन्ज्युरी अर्थात मेंदूच्या दुखापतीचे रुग्ण पाहिले आहेत. मेंदूच्या दुखापतीमुळे रुग्णाच्या एकूण जीवनावर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.” असं डॉ. चैतन्य यांनी सांगितलं.
खरं तर कोणत्याही परिस्थितीत मेंदूची दुखापत टाळणं गरजेचं आहे. यामुळे संबंधित व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. या संदर्भातील काही उदाहरणं पाहूया.
1. साधारण 20 वर्ष वयाचा एक बेफिकीर तरुण त्याच्या नवीन बाइकवरून जात असताना एका वाहनाला धडकला. या अपघातात तरुणाच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. जर वेळेत रुग्णवाहिका मिळाली नसती तर कदाचित खूप उशीर झाला असता. त्याच्या मेंदूला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की अजूनही पूर्ण बरा झालेला नाही. त्याच्यावर सहा वर्षांत अनेक शस्त्रक्रिया झाल्या पण तो अद्यापही अंथरुणाला खिळलेला आहे. तो बोलू, चालू आणि विचार करू शकत नाही. त्यामुळे त्याला पूर्णपणे कुटुंबियांवर अवलंबून राहावं लागतंय.
2. फ्लॅटच्या बाल्कनीत एक पाच वर्षांचा मुलगा खेळत असताना त्याचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या अभावामुळे या निरागस मुलाला गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला.
3. एक प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ हॉस्पिटलमधून घरी जात होते. ते दिवसभर कामामुळे खूप थकलेले होते. त्यामुळे लवकर घरी जाण्यासाठी ते वेगात चालले होते. थकल्यामुळे त्यांना रस्त्यातील अडथळा लक्षात आला नाही आणि त्यांची कार हवेत उडून खाली पडली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रदीर्घ काळ रिहॅबिलिटेशन घेऊनसुद्धा ते अंथरुणाला खिळले. यात समाजाचे केवढे मोठे नुकसान झाले?
4. एक व्यक्ती त्याच्या गॅरेजमधून कार रिव्हर्स घेत बाहेर काढत होता. तो घाईत असल्याने त्या ठिकाणी त्याचे मूल खेळत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. निव्वळ निष्काळजीपणा आणि घाईमुळे या मुलाच्या अंगावरून कार गेली.
5. एक कॅब ड्रायव्हर, खूप ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करताना फोनवर बिझी होता. मागच्या गाडीतील एक वयोवृद्ध ड्रायव्हर उशीर होत असल्याने सारखा हॉर्न वाजवत होता. त्यामुळे वैतागलेल्या कॅब ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि एक मोठा दगड त्या वयस्कर ड्रायव्हरला मारला. हा दगड त्या वयस्कर ड्रायव्हरच्या डोक्याला लागला. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रोड रेज हे डोक्याला दुखापत होण्याचे एक सामान्य कारण बनत चालले आहे.
डोक्याच्या दुखापतीची अशी उदाहरणं आपण रोज पाहतो. मात्र योग्य ती खबरदारी घेऊन आणि प्रसंगी नियमांचे पालन करुन अशा दुखापती टाळता येऊ शकतात. या संदर्भात माझ्या निरीक्षणातून समोर आलेल्या काही उपाययोजना पाहूया.
1. वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि सहचालकांप्रती सहिष्णुता बाळगल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.
2. बाल्कनी, टेरेस किंवा कोणत्याही उंच ठिकाणी असताना लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा दरवाजे किंवा जाळ्या लावल्या आहेत ना याची खात्री करा.
3. ड्रायव्हिंग करताना मल्टिटास्किंग करू नका. एखादा सेकंद तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.
4. अतिघाई संकटाकडे नेते. त्यामुळे वेगात, घाईने वाहन चालविणे टाळा.
5. ड्रायव्हिंग करतेवेळी मद्यपान टाळा. मद्यपान केल्यास तुम्ही तुमच्यासोबत इतरांचा जीव धोक्यात घालू शकता.
डोके किंवा मेंदूला दुखापत होऊ नये यासाठी सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे.
1. सरकार, दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवून डोक्याला दुखापत रोखण्यात मोठी भूमिका बजावते. जागतिक डोके दुखापत जागृती दिनानिमित्त सरकार आणि संबंधित अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अपघात टाळण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने पाऊल उचलले पाहिजे.
2. रस्त्यांवर खड्डे नाहीत ना, रस्त्यांची बांधणी अशास्त्रीय नाही तसेच ते योग्य स्थितीत आहेत ना याची खात्री करणं गरजेचं आहे. वारंवार रस्ते खोदणं टाळण्यासाठी संबंधित विभागांमध्ये योग्य समन्वय असला पाहिजे.
3. रस्त्यांवर योग्य दिशा फलक, वाहतूक सिग्नल आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे.
4. रुंद आणि प्रवेश करण्याजोगे फूटपाथ, भूमिगत / ओव्हर हेड पादचारी क्रॉसिंग तयार करणं तसंच त्यांची योग्य देखभाल करणं गरजेचं आहे.
5. वैयक्तिक वाहन चालविण्याचा परवाना देताना कठोर शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे. तसेच वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई झाली पाहिजे आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेमुळे अपघात आणि डोक्याला प्राणघातक इजा होण्याचे धोके वाढत आहेत. यात आपल्याला एखाद्या वेळी एक सीमारेषा आखावी लागेल. तणावावर नियंत्रण ठेवावे लागले. तणाव आणि अपघातापेक्षा आरोग्य तसेच आनंद या गोष्टींची निवड करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.