साहित्यामध्ये ताकद असलेले अनेकजण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. १९५३ मध्ये अहमदाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वि. द. घाटे अध्यक्ष होते. यावरूनच घाटे यांचे साहित्यातील योगदान स्पष्ट होते. १९५२ ते १९५५ या चार वर्षांत ‘मुंबई राज्य विधानसभेचे’ ते सदस्य होते. मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रचार-प्रसार कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, तसेच परिषदेचे ‘माधवराव पटवर्धन सभागृह’ बांधण्याच्या कामातही त्यांचे मोलाचे सहकार्य होते.
आचार्य अत्रे यांच्या सह-कार्याने ‘अत्रे-घाटे नवयुग वाचनमाला’ ही मराठीची क्रमिक पुस्तके तयार करून महाराष्ट्रात क्रमिक पुस्तकांचे नवयुग निर्माण केले. शिक्षकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ‘घाटे-परुळेकर समिती’च्या माध्यमातून शिक्षकांची वेतनश्रेणी निश्चित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. म्हणजे साहित्य, समाजसेवा, नेतृत्व यासह अनेक बाबतीत त्यांचे योगदान मोठेच समजले जाते. बहुविध साहित्यसंपदेमधून त्यांच्या लेखनातील काव्यात्मता, नाट्यात्मता, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ, अभिजात रसिकता या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांची गद्यशैली सुटसुटीत, रसपूर्ण व लयदार होती. साहित्यामधून त्यांचे उत्कट व दिलखुलास व्यक्तिमत्त्वच प्रकट होते. आत्मपरता हा जसा त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा ठळक गुण होता, तसेच आगळेवेगळे जीवन जगणार्या विविध क्षेत्रांतील विविध माणसांविषयीचे प्रेम हाही एक अनोखा गुण होता. माणूस हा त्यांच्या निरीक्षणाचा आणि अभ्यासाचा विषय होता. माणसातील वेगळेपण जाणून घेऊन इतरांना ते रंगतदार शैलीत सांगण्याचा विलक्षण छंद घाटे यांना होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरला व माध्यमिक, तसेंच उच्च शिक्षण इंदूर येथे झाले. मुंबई व लंडन येथील शिक्षणशास्त्राच्या पदव्या त्यांनी मिळविल्या. मुंबई इलाख्याच्या शिक्षणखात्यात विविध अधिकार पदांवर नोकरी करून शेवटी डेप्युटी डिरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी शालेय पुस्तके, शैक्षणिक ग्रंथ, कविता, व्यक्तिचित्रे, ललित निबंध, आत्मवृत्त, नाटक इ. विविध प्रकारचे लेखन केले. शिक्षण आणि व्यवसाय यांच्या निमित्ताने महाराष्ट्र, माळवा, गुजरात, कर्नाटक अशा विविध प्रदेशांत तसेच परदेशातही वास्तव्य घडल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहुरंगीपणा आला. त्यांच्या जीवनविषयक व्यापक आणि समृद्ध जाणिवांचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. त्यांचे पुष्कळसे लेखन स्वान्तःसुखाय झालेले आहे. त्यांचे उत्कट पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा त्यात मिलाफ झालेला दिसतो. त्यांची गद्यशैलीही सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार आहे. १९२० मध्ये ‘दत्तांची कविता’ या नावाने त्यांनी वडिलांच्या, कवी दत्त यांच्या कवितांचे संकलन प्रकाशित करून त्यांनी आपली वाङ्मयीन कारकिर्द सुरू केली. त्या काळातील प्रसिद्ध कवी चंद्रशेखर, माधव ज्यूलियन, रा. वि.मराठे, नामदेव भाटे हे त्यांचे साहित्यिक मित्र होते. चंद्रशेखर कवींमुळे त्यांना कवितेची गोडी लागली. घाटे यांच्या साहित्यसंपदेत कविता, व्यक्तिचित्रे, ललितनिबंध, नाट्यप्रवेश, नाटके, क्रमिक पुस्तके, विद्यार्थ्यांसाठीची पुस्तके, इतिहासावरील पुस्तके अशा विविध वाङ्मय प्रकारांचा समावेश होतो. त्यांनी व्यक्तिगत आयुष्याच्या कथनापेक्षा सामाजिक जीवनाचे दर्शन अधिक घडविल्याने ते अभ्यासनीय झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वसमस्यांना त्यात उत्तर सापडते, असे म्हटले गेले आहे!