ऋचा कानोलकर, प्रतिनिधी
मुंबई, 19 मे : मुंबईच्या ताडदेवमध्ये मुंबई महापालिकेच्या इमारतीत प्रकल्पग्रस्त जीव मुठीत घेऊन राहतायत. याच प्रकल्पग्रस्तांना राहण्यासाठी राखीव नवीकोरी इमारत दोन वर्षांपासून तयार आहे. मात्र, एकाही प्रकल्पग्रस्ताला त्या घराचा ताबा दिला गेला नाही. दोन-तीन महिने ट्रान्सिट कॅम्पमध्ये राहावं लागेल, असं पालिकेकडून सांगण्यात आलं. मात्र, कित्येक रहिवासी आपल्या हक्काचं घर मिळेल या आशेनं दहा-बारा वर्ष याच धोकादायक वास्तूमध्ये राहत आहेत.
ताडदेवच्या तुळशीवाडीमध्ये असलेल्या झोपड्या पाडून विकासकांनी ती जागा ताब्यात घेतली. 18 मजली टॉवर्स बांधले. मात्र, ज्यांच्या घरावर हातोडा फिरला त्या मूळ रहिवाशांना आपलं हक्काचं घर दहा वर्ष उलटूनही मिळालेलं नाही. झोपडीत राहणाऱ्यांना तुळशीवाडी पोस्ट ऑफिसजवळच एका संक्रमण शिबिरात (ट्रान्सिट कॅम्प) मध्ये राहण्यास जागा दिली गेली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
वाचा – नवी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा; त्याच भिंतींना पुन्हा रंग
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात घरं गेलेल्या रहिवाशांना जीर्ण झालेल्या या ट्रान्सिट कॅम्पमध्ये जीव मुठीत धरून राहावं लागत आहे. इमारतीत पाणीपुरवठा नाही, शौचालयांना पालिकेकडून टाळं लावलंय, घरांना खिडक्या नाहीत, अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम असल्यानं उंदरांनी भिंतीही पोखरल्यात. अशाच स्थितीत नाईलाजास्तव प्रकल्पग्रस्त राहतायत. अनेकदा स्लॅबचा भाग कोसळून, गंजलेल्या सळ्या लागून इथल्या रहिवाशांना दुखापतही झाली आहे. लाईटबोर्ड तुटल्यानं शॉकही लागलेत. मात्र, तक्रार करायची तरी कुणाकडे अशी खंत हे रहिवासी व्यक्त करत आहेत.
वाचा – मोठी बातमी! मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठं यश
एकीकडे तुळशीवाडी ट्रान्सिट कॅम्पची ही इमारत धोकादायक असून ती पाडण्याचे आदेशही मुंबई महापालिका देते, तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांना याच ठिकाणी राहायला भाग पाडतेय. इमारतीची ही दुरावस्था पाऊस नसताना दिसतेय, पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.