अहमदाबाद, 10 एप्रिल : यंदाच्या आय़पीएल हंगामातला आतापर्यंतचा सर्वात रोमहर्षक असा सामना अहमदाबादमध्ये केकेआर आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. गमावलेला सामना केकेआरने रिंकू सिंहच्या 5 षटकारांच्या जोरावर जिंकला. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या होत्या. हे आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण होण्याची शक्यता कमी होती. मात्र रिंकू सिंहने केलेल्या फटकेबाजीने सामन्याचा निकालाच बदलून टाकला.
नाइट रायडर्सच्या हातून सामना निसटला होता. त्यांना अखेरच्या पाच चेंडूत विजयासाठी 28 धावा हव्या होत्या. तेव्हा रिंकू सिंहने पाच चेंडूवर पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूने ज्या गोलंदाजाला पाच षटकार मारले त्याने दोनच दिवसांपूर्वी रिंकूचे कौतुक केले होते. यश दयालसाठी अखेरचं षटक एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीय.
मी शेतकरी कुटुंबातला, माझा प्रत्येक षटकार…; सामन्यासह रिंकूने मनही जिंकले
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने यश दयालला 3 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. पहिल्या हंगामात यशने 9 सामन्यात 11 विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर त्याला बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघातही जागा मिळाली होती. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत त्याची कामगिरी फारशी चमकदार नाही.
रिंकू सिंह आणि यश दयाल हे दोघेही उत्तर प्रदेशकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळतात. दोघेही एकाच संघाचे प्रतिनिधित्व करतात. केकेआरने आरसीबीवर मोठा विजय मिळवला तेव्हा रिंकूने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर रिंकूने विजयानंतर आनंद झाल्याचं रिंकूने म्हटलं होतं. त्याच पोस्टवर यश दयालने कमेंट करत रिंकूचे कौतुक केलं होतं. रिंकू मोठा खेळाडू असल्याचं तो म्हणाला होता. यावर रिंकूने रिअॅक्शनही दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.