दिल्ली, 28 एप्रिल : शिवसेना पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर ठाकरे गटाकडे पक्षाची असलेली संपत्तीही शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत याचिकाकर्त्याला फटकारले आहे. ठाकरे गटाची संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याबाबत ही याचिका होती. शिवसेना भवनासह पक्षाचा निधी, शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.
याचिका दाखल करणाऱ्या वकील आशिष गिरी यांना न्यायालयाने या प्रकरणी फटकारले आहे. संपत्ती शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण असा प्रश्न विचारत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि पक्ष निधी ठाकरे गटाकडेच राहणार आहे.
पक्ष आणि पक्षचिन्ह गमावल्यानतंर आता संपत्तीबाबत दाखल केलेल्या याचिकेमुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सुनावणी झाली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानं ठाकरे गटाला मोठा दिसाला मिळाला.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांसह भाजपसोबत राज्यात सत्ताही स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या दोन्हीवर दावा केला. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे अर्जही केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही शिंदेंना दिलं. त्यानंतर शिवसेना भवन आणि पक्ष निधी कोणाचा याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, शिंदे गटाकडून आपण यावर दावा करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. पण वकील गिरी यांननी न्यायालयात याचिका दाखल केल्यानं खळबळ उडाली होती. या याचिकेचा थेट शिंदे गटाशी काहीही संबध नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.