तुळजापूर, 19 मे : तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचे फलक मंदिर परिसरात लावल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कपड्यांवर निर्बंधाच्या या फलकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भाविकांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, मंदिर प्रशासनाकडून अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लागू केले नसल्याचं स्पष्टीकरण तहसिलदार सौदागर तांदळे यांनी दिलं आहे.
मंदिराबाहेर अनेक ठिकाणी बोर्ड लावण्यात आले होते. त्यावर म्हटलं होतं की, अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी, तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा असंही बोर्डवर लिहिलं होतं. यावर तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर असंही लिहिण्यात आले होते. मात्र आता मंदिर संस्थानचे व्यवस्थापक असलेल्या तहसिलदार सौदागर तांदळे यांनी असे कोणतेच निर्बंध भाविकांवर नसल्याचं सांगण्यात आलं.
मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, तुळजाभवानी मंदिरामध्ये पुजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत असं परिपत्रक तहसिलदारांकडून काढण्यात आलं आहे.
दरम्यान, अचानक बोर्ड लावल्यानंतर एका दहा वर्षाच्या मुलाला सुरक्षा रक्षकांनी दर्शन घेण्यापासून अडवले. त्यानतंर भाविकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला. भाविक भक्तांचा वाढता रोष पाहता तुळजापूर मंदिर संस्थानने ड्रेस कोडबाबत कोणतेही निर्बंध लादण्यात आले नसल्याचं स्पष्ट केलं.
रांजणगाव गणपती मंदिरातही असाच निर्णय
तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिराचा परिसर या ठिकाणी वेस्टर्न कपडे अर्थात पाश्चात्य कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश बंदी घालण्यात आल्याचे बोर्ड लावले होते. त्याचे फोट व्हायरल झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर प्रशासनाने देखील असाच निर्णय घेतला. अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरात तोकडे कपडे घातलेले तसेच अंगप्रदर्शन करणारे, असभ्य अशोभनीय वस्त्रधारी, उत्तेजक कपडे घातलेले, हाफ पॅन्ट घातलेले, बर्मुडाधारक यांना आता मंदिरात प्रवेश नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.