मुंबई, 12 मे : मराठी सिनेमांना स्क्रिन्स न मिळणं हा प्रश्न आजही तितकाच गंभीर आहे. भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या TDM नंतर आलेल्या ‘तेंडल्या’ सिनेमाचे देखील असेच हाल झाले आहेत. केवळ एका आठवड्यात सिनेमा थिएटरमधून काढून टाकण्याची वेळ आली आहे. 5 मे रोजी तेंडल्या हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. तेंडल्या सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं. मात्र दुसऱ्याच आठवड्यात निर्माता आणि दिग्दर्शकांच्या हाती निराशा आली. संपूर्ण महाराष्ट्रात तेंडल्या सिनेमाचे केवळ पाचच शो पाहायला मिळत आहेत. दरम्यान सिनेमाच्या टीमनं एक पोस्ट शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केलीये. त्याचप्रमाणे सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील 8 तरूणांनी मिळून तेंडल्या या सिनेमाची निर्मिती केली आहे. पैशांची जुळवाजुळव करून, उसनवारी करून, कर्ज काढून या तरूणांनी हा सिनेमा बनवला. या सिनेमाला 5 राज्य आणि एका राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे तेंडल्या सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. सिनेमा तयार करण्यासाठी 1 कोटी 70 लाख रूपयांचं कर्ज त्यांनी घेतलं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी सर्वांवर शेतात राबण्याची वेळ आली.
हेही वाचा – मृण्मयी देशपांडेने सिनेसृष्टीला केलं रामराम?मुंबई सोडून महाबळेश्वरला शिफ्ट झाली अभिनेत्री; आता करतेय शेती
दरम्यान इतक्या मेहनतीनंतर सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये आला तेव्हा मात्र सिनेमाला शोच मिळाले नाहीत. परंतू ज्या ठिकाणी शो मिळाले आहेत तिथे सिनेमा हाऊसफुल सुरू आहे. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दुसऱ्याच आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमाचे केवळ 5 शो सुरू आहेत. सिनेमाच्या टीमवर या परिस्थितीवर पोस्ट लिहिल खंत व्यक्त केलीये.
तेंडल्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करण्यात आलीये. त्यात असं लिहिलंय, “आज आपल्या लाडक्या तेंडल्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. पण तेंडल्याचं पिच काढून घेण्याचं षडयंत्र चालू आहे. आज तेंडल्या फक्त 5 स्क्रिन्सवर आहे. 5च्या 5 शो हाऊसफुल आहेत. आम्हाला शो वाढवून का मिळत नाही आहेत या कारणमीमांसेत जाण्याची ही वेळ नाही. कारण उत्तर ठाऊकच आहे सर्वांना. बोलावं तरी कुणाला? वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणार”.
पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, “सिस्टीम जे बाऊंसर टाकतेय ना ते आता फक्त डक करत रहायचे एवढंच ठरवलंय. एकदा का ताप उतरला की जोरदार अप्पर कट मारून बॉल थेट स्टेडिअमबाहेरच फटकावून काढू. आम्ही तर टीम तेंडल्या पिचवर नांगर टाकून सज्ज आहोत. तोवर तेंडल्याला तुमची भक्कम साथ हवी आहे. आपलं सिनेमाप्रेम, मराठीप्रेम बेगडी नाही हे दाखवून देण्यासाठी साथ हवी आहे. द्याल ना?”.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.