चंद्रपूर, 15 एप्रिल : एका घराचं किचन एका राज्यात तर हॉल दुसऱ्या राज्यात आहे, असं सागितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. वास्तविक, चंद्रपूर जिल्ह्यात अशाच एका घरात 13 जणांचे पवार कुटुंब राहते. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिवती तहसीलच्या महाराजागुडा गावात महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर पवार कुटुंबीयांचे घर असून, अनेक वर्षांपासून ते दोन्ही राज्यात मालमत्ता कर भरत आहेत. यासोबतच ते दोन्ही राज्यांच्या लाभार्थी योजनांचाही लाभ घेतात. त्यांच्या वाहनांवरही दोन्ही राज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत. वाचायला विचित्र वाटत असेल पण हे सत्य आहे.
महाराजगुडा गावात 10 खोल्यांच्या घरात पवार कुटुंबीय राहतात. यातील चार खोल्या तेलंगणात तर चार खोल्या महाराष्ट्रात आहेत. स्वयंपाकघर तेलंगणात आहे तर बेडरूम आणि हॉल महाराष्ट्रात आहे. पवार कुटुंबातील 13 सदस्यांपैकी उत्तम पवार आणि चंदू पवार हे दोन भाऊ या घरात वर्षानुवर्षे राहतात. 1995 मध्ये सीमावादावर अखेर तोडगा निघाला तेव्हा पवार कुटुंबीयांच्या जमिनीची दोन राज्यात विभागणी झाली. हे घरही दोन भागात विभागले गेले. आजपर्यंत या कुटुंबाला कोणतीही अडचण आली नसली तरी ते दोन्ही राज्यात मालमत्ता कर भरत आहेत. याबाबत उत्तम पवार म्हणाले, आमचे कुटुंब महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये विभागले गेले आहे. मात्र, आजपर्यंत आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. आम्ही दोन्ही राज्यांमध्ये मालमत्ता कर भरतो आणि दोन्ही राज्यांच्या योजनांचा लाभ घेत आहोत.
वाचा – देशातल्या सर्व पोलिसांचा गणवेश खाकी, पण कोलकाता पोलीस पांढरा गणवेश का वापरतात?
महाराष्ट्र आणि तेलंगणाने सीमेवरील 14 गावांवर दावा केला आहे. सुप्रीम कोर्टानेही ही गावे महाराष्ट्राची असल्याचा निकाल दिला आहे, तरीही तेलंगण त्यांच्यावर दावा करत आहे. या 14 गावांपैकी महाराजगुडा गाव हे दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे. केवळ गावच नाही तर पवार कुटुंबीयांचे घरही दोन राज्यात विभागले गेले आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातही वाद
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादामुळे तणाव वाढला आहे. दोघेही काही क्षेत्रांबाबत आपापले दावे मांडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यासंदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही, तोपर्यंत दोन्ही राज्ये याबाबत कोणताही दावा मांडणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.