नागपूर :- केंद्रातील भाजपा सरकारने समाजातील घटकांना काय दिले, याचे उत्तर जनसंवाद पदयात्रेतून आम्ही शोधणार आहोत. या पदयात्रेतून काँग्रेस मजबूत होणार आहेच, मात्र जनसंवादाच्या माध्यमातून ही पदयात्रा माणसाशी माणसाला जोडणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी दक्षिण नागपूरमध्ये केले.
काँग्रेसचे नेते, युवकांचे आशास्थान राहुल गांधी यांच्या देशव्यापी भारत जोडो यात्रेनंतर देशभरात काँग्रेसने जनसंवाद पदयात्रा आयोजित केल्या आहेत. या पदयात्रेचा शुभारंभ दक्षिण नागपूरमध्ये रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात झाला. याप्रसंगी गिरीश पांडव, आ. विकास ठाकरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी वडेट्टीवार यांनी भाजपाच्या धोरणावर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी भाजपा समाजाच्या कार्यकर्त्यांना बदडून काढत असल्याचे नमूद केले. जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशाने लाठीचार्ज करण्यात आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
या पदयात्रेत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीने वातावरण काँग्रेसमय झाले. सर्वत्र उत्साह दिसत होता.