महेश तिवारी, प्रतिनिधी
बिजापूर, 26 मे : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. आरबीआयच्या या नोटबंदीचा धसका माओवाद्यांनी घेतला आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करून पैसे बदलण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. छत्तीसगड पोलिसांनी सहा लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नोटांसह माओवाद्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं आहे.
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये तपासणी नाक्यावर मोटरसायकलवर जाणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अडवलं आणि त्यांची चौकशी केली. तपासामध्ये पोलिसांना त्यांच्याकडच्या बॅगेमध्ये दोन हजारांच्या नोटा असलेले सहा लाख रुपये सापडले. यासह पोलिसांनी त्यांच्याकडून 11 वेगवेगळ्या बँकांची पासबुकं आणि माओवादी प्रचाराचं साहित्य जप्त केलं आहे.
माओवाद्यांच्या प्लाटुन क्रमांक 10 चा कमांडर मल्लेशने नोटबंदीमुळे ही रक्कम बदलण्यासाठी दिल्याची माहिती अटक केलेल्यांनी दिली आहे.
नोटा बदलण्याचा नियम
आरबीआयच्या परिपत्रकानुसार 2 हजार रुपयांच्या नोटा तुमच्या बँकेत जाऊन जमा करता येतील किंवा या नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटाही घेता येतील. 23 मे 2023 पासून बँकेत जाऊन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलायला सुरूवात झाली आहे, पण एकावेळी फक्त 20 हजार रुपयेच जमा करता येणार आहेत.
2 हजारांच्या नोटा आरबीआय अॅक्ट 1934 सेक्शन 24 (1) अंतर्गत आणल्या गेल्या होत्या. जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटांची तूट होऊ नये म्हणून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. दुसऱ्या नोटा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटांचं उद्दीष्ट संपलं होतं, त्यामुळे 2018-19 सालीच 2 हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.