धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 13 मे : मुंबईकरांना आंब्याची चव चाखता यावी यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्याना जवळच्या पालिकेच्या मैदानावर आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. हा आंबा महोत्सव 12 मे (शुक्रवारी) सुरु झाला असून 14 मे पर्यंत चालणार आहे. हा आंबा महोत्सव विक्रांत आचरेकर यांनी भरवला असून या महोत्सवाचे यावर्षीचे दुसरे पर्व आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात पालखीमध्ये आंबे ठेवून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील उद्यान गणेश मंदिरात बाप्पा चरणी अर्पण करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
आम्र दिंडी ठरली आकर्षण
तुमच्या शहरातून (मुंबई)
आम्र दिंडी हे या महोत्सवाचे खास आकर्षण होतं. यावेळी सर्वांनी पारंपारिक मराठमोळा पोशाख , तर महिलांनी नऊवारी साडी, फेटे परिधान करून या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यंदाचे हे आंबा महोत्सवाचे दुसरे वर्ष असून तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्र योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आलं आहे.
काय काय असणार महोत्सवात?
या तीन दिवसीय महोत्सवात 50 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये आंब्याचे स्टॉल, आंब्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचे स्टॉल, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, पाककला स्पर्धा, सेल्फी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मधुर सांगितिक कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षीस देखील देण्यात येणार आहेत. तसेच आंबा महोत्सवात येणाऱ्यांसाठी खास कोकणातील निसर्गरम्य वातावरण आणि आंब्याच्या काही प्रतिकृती उभारून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. इथे येणाऱ्या आंबा प्रेमींचा हा सेल्फी पॉईंट खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
गणरायाला साकडं
अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक जण देवाच्या चरणी आंबे अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही देखील महोत्सवाच्या सुरुवातीला आंब्याची पहिली पेटी गणरायाच्या चरणी अर्पण करून या महोत्सवाची सुरुवात केली. तसेच कोकणातील मालवणमध्ये प्रसिद्ध असलेलं गाऱ्हाणं बोलून व्यवस्थित हा महोत्सव आणि ही दिंडी पार पडावी यासाठी गणरायाला साकडं घातलं.
तुमचा श्वान हरवला तर लगेच सापडणार! मुंबईकर तरुणाची भन्नाट आयडिया पाहाच VIDEO
आंबा महोत्सव घ्यावा की न घ्यावा इतपत शेवटपर्यंत विचार सुरू होता. कारण बाजारपेठेत यंदा आंबा उपलब्ध नव्हता. मात्र, शेतकऱ्यांना एक खुली बाजारपेठ मिळावी म्हणून या वर्षी सुद्धा या महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं. तसेच संकटात सुद्धा मदत करणं गरजेचं असतं. त्याच दृष्टीने या आंबा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. तसेच मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या आंबा महोत्सवाला भेट द्यावी, अशी विनंती आयोजक विक्रांत आचरेकर यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.