मुंबई, 12 एप्रिल : आयपीएल २०२३ मध्ये अखेरच्या दिवसात रोमहर्षक सामने बघायला मिळत आहेत. केकेआर विरुद्ध लखनऊ सुपर जायट्सने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. तसाच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सनेही सामना जिंकला. मुंबईने हा सामना ६ विकेट राखून जिंकत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईसमोर दिल्ली कॅपिटल्सने १७३ धावांचे आव्हान ठेवले होते.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत केलेल्या ६५ धावा आणि तिलक वर्माच्या ४१ धावांनंतरही विजयासाठी मुंबईला झगडावे लागले. अखेरच्या षटकात प्रत्येक चेंडूला सामन्याचं चित्र बदलत होतं. मुंबई सामना सहज जिंकेल असं वाटत असताना अखेरच्या तीन षटकात दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. पण अखेरच्या चेंडूवर मुंबईने बाजी मारली.
पहिल्या चेंडूवर नॉर्खियाने यॉर्कर टाकला. यावर कॅमेरून ग्रीनने एक धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर टीम डेविडचा झेल मुकेश कुमारने सोडला. हा झेल सोडणं दिल्ली कॅपिटल्सला महागात पडलं. तिसरा चेंडू पुन्हा यॉर्कर टाकला, हा चेंडू पंचांनी वाईड दिला. यावर वॉर्नरने डीआरएस घेतला. यात चेंडू बॅटला लागून गेल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पंचांना निर्णय बदलावा लागला. या चेंडूवर मुंबईला धाव मिळाली नाही.
चौथा चेंडू नॉर्खियाने फुलटॉस टाकला. या चेंडूवर टीम डेविडने एक धाव घेतली आणि स्ट्राइकला ग्रीन आला. पाचवा चेंडूही यॉर्कर होता, यावर ग्रीनने एक धाव काढली. अखेरच्या चेंडूवर मुंबईला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. डेविडने चेंडू मारल्यानंतर एक धाव सहज पूर्ण केली. मात्र, वॉर्नरने थ्रो केल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाकडे पोहोचेपर्यंत डेविड क्रीजमध्ये पोहोचला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.