NDA Vs INDIA: मल्लीकार्जुन खर्गे यांच्या केबीनमध्ये ठरली रणनीती
Delhi Services Bill News: दिल्ली सरकारच्या अधिकारांवर घाला घालणारे वादग्रस्त ठरलेले दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून ते सोमवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयक मंजूर होऊ नये यासाठी इंडियातील काँग्रेस आणि आम आदमीसह सर्व पक्ष एकवटले आहेत. या विधेयकावरून राज्यसभेत घमासान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हे विधेयक किती मतांनी पारित होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
दिल्ली सेवा विधेयक बहुमताच्या जोरावर लोकसभेत मंजूर केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, आप या पक्षांनी आपल्या खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. राज्यसभेतील रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विरोधी पक्षाची मल्लिकार्जुन खर्गे यांच्या केबिनमध्ये इंडियाची बैठक पार पडली. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यामुळे या विधेयकावर राज्यसभेत मोठे घमासान होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यसभेत आपसह विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीने या विधेयकाला विरोध केला आहे. दरम्यान, बिजू जनता दल (बीजेडी)ने समर्थन दिल्याने विधेयक संमत करून घेण्यास भाजपाला अडचण नाही. राज्यसभेत भाजपच बहुमत काठावर असल्यामुळे वायएसआर, तेलगू देशम पार्टी (टीडीपी), बीजेडी या पक्षाच्या जोरावर भाजप हे विधेयक मंजूर करून घेऊ शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र या विधेयकाच्या चर्चेवेळी राज्यसभेत मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत ‘सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली’ (सुधारणा) विधेयक, 2023 सादर करणार आहेत. दिल्ली सेवा विधेयक राष्ट्रीय राजधानीतील सेवांच्या नियमनाच्या अध्यादेशाची जागा घेईल. सोमवारी राज्यसभेमध्ये मांडल्या जाणाऱ्या विषयांमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधेयक अंतिम विचारासाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. या विधेयकाला आपने जोरदार विरोध केला आहे. ‘आप’ला काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने पाठिंबा दिला आहे