मुंबई, 30 एप्रिल : येदुगुरी संदिंती जगन मोहन रेड्डी अर्थात जगन रेड्डी 30 मे 2019 पासून आंध्र प्रदेशचे 17 वे आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते उद्योजक आणि राजकारणी आहेत. जगन रेड्डी वायएसआर काँग्रेस पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष असून सध्या ते देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात एडीआरच्या अहवालानुसार, जगन रेड्डी यांच्याकडे 510 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. ही देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या एकत्रित मालमत्तेपेक्षा जास्त आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि राजकीय प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊया.
शैक्षणिक पात्रता
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जन्म 21 डिसेंबर 1972 रोजी झाला. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील जम्मालामादुगु येथे एका ख्रिश्चन रेड्डी कुटुंबात झाला. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी आणि वाय.एस. विजयम्मा हे जगन मोहन रेड्डी यांचे आई-वडील होत. वाय.एस. शर्मिला ही रेड्डी यांची धाकटी बहीण असून ती देखील राजकारणात आहे. हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हैदराबादमधील कोटी येथील प्रगती महाविद्यालय पदवी आणि पीजी कॉलेजमधून बी. कॉमची पदवी घेतली. 28 ऑगस्ट 1996 रोजी जगन मोहन रेड्डी भारतीशी विवाहबद्ध झाले.
हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडून शिका, गरीबातून श्रीमंत कसे व्हावे? स्वप्न पूर्ण करणं सोप्पंय!
रेड्डी यांनी 2001 मध्ये मूळ प्रवर्तक एम.बी. घोरपडे यांच्याकडून संदूर पॉवर कंपनी लिमिटेड (एसपीसीएल) हा निकामी झालेला ऊर्जा प्रकल्प विकत घेतला. एसपीसीएलने नंतर इतर कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आणि आणखी काही उद्योग ताब्यात घेतले. याची सूत्रं त्यांची पत्नी वाय.एस. भारती यांच्याकडे आहेत. रेड्डी यांनी नंतर एसपीसीएलमधील त्यांचे शेअर्स विकले आणि राजकारणात अधिक गुंतल्याने त्यांची व्यवसायांमधील थेट सक्रियता कमी झाली.
राजकीय वाटचाल
जगन मोहन रेड्डी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2009 मध्ये ते कडप्पाचे खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी राज्यभर ओडारपू यात्रा (सांत्वन यात्रा) सुरू केली. दरम्यान ते काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे नाव त्यांनी त्यांच्या वडिलांच्या वायएसआर या संक्षिप्त नावावरून ठेवले.
2014 मध्ये, आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत वायएसआरसीपीने 67 जागा जिंकल्या आणि ते विरोधी पक्षनेते बनले. पाच वर्षांनंतर 2019 मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा पक्षाचे नेतृत्व केले. वायएसआर काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत विजय मिळवला. आंध्र प्रदेशातील एकूण 175 विधानसभा जागांपैकी 151 आणि लोकसभेच्या 25 जागांवर वायएसआर काँग्रेसने विजय मिळवला.त्यानंतर 30 मे 2019 रोजी जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.