नवी दिल्ली: देशातील उद्योगपतींच्या किंवा क्रिकेटपटूंच्या संपत्तीबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध होतात. कोणाकडे किती संपत्ती आहे, हे त्या माध्यमातून आपल्याला माहीत होतं. देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती, क्रिकेटपटू किंवा अभिनेता कोण आहे, हे तुम्हाला माहिती असेल. पण, देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती उघड झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री आहेत तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वांत कमी संपत्ती आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) रिपोर्टमध्ये देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील देण्यात आला आहे.
एडीआरनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री करोडपती आहेत. यापैकी 18 मुख्यमंत्री असे आहेत ज्यांची संपत्ती 1 ते 10 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर आठ मुख्यमंत्र्यांची संपत्ती 10 ते 50 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तर तीन मुख्यमंत्री 50 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत.
या रिपोर्टमधील माहितीनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक 510.38 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांच्या नावे सुमारे दोन कोटी रुपयांचं कर्ज आहे. श्रीमंतीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे आहेत. त्यांच्याकडे 163.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिसर्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत. त्यांच्याकडे 63.87 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अपघातामुळे लहान मुलावर आली हात गमवण्याची वेळ; पण….., वाचा नेमकं काय घडलं?
एडीआरच्या रिपोर्टमधील माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 15.38 लाख रुपयांची संपत्ती आहे. ही संपत्ती त्यांनी स्वतः कमवल्याचं सांगण्यात आलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे गरीब मुख्यमंत्री आहेत. विजयन यांच्याकडे 1.18 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आहेत. त्यांच्या नावे 1.27 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
सर्वाधिक मालमत्तेच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26व्या क्रमांकावर आहेत. सीएम योगी 1.54 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे तीन कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे 3.44 कोटी रुपयांची संपत्ती आहे तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील 1.97 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
एडीआर रिपोर्टनुसार, देशातील 11 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि ते सर्व कोट्यधीश आहेत. छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. यापैकी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे सर्वाधिक 23 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.