मो.महमूद आलम, प्रतिनिधी नालंदा, १ जून : आपण पशुप्रेमाची असंख्य उदाहरणं पाहिली आहेत, पशुप्रेम प्रत्यक्ष अनुभवलंही आहे. शिवाय यावर ‘हाथी मेरे साथी’ यासारखे अनेक चित्रपटदेखील आले आहेत. एखाद्या पाळीव प्राण्याचा वाढदिवस साजरा झाल्याचंही आपण ऐकलं असेल, पण एखाद्या प्राण्याची विधिवत अंत्ययात्रा निघाल्याचं आपण पाहिलं आहे का? आश्चर्य वाटलं ना? पण असं खरोखर घडलं आहे, बिहारच्या नालंदा भागात. येथे जीवापाड प्रेम असलेल्या घोड्याच्या मृत्यूनंतर मालकाने त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याची वाजत गाजत अंत्ययात्रा काढून त्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. या घटनेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
या प्रेमाला काय नाव द्यावे? अधिकाऱ्याच्या घरी सगळे हक्काने येतात, पोटभर खातात आणि…
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यालय बिहारशरीफ येथील पटुआनाचे रहिवासी विशुनदेव प्रसाद या प्राणीप्रेमी व्यक्तीला घोडेस्वारी आणि घोडे पाळण्याचा मोठा छंद आहे. या छंदातूनच त्यांनी घोडेस्वारी व्यवसाय निवडला आणि अनेक वर्षांपूर्वी सोनापूरहून एक घोडा विकत आणला. घरातील सदस्याप्रमाणे ते त्याची काळजी घेत असत, घोड्यालाही त्यांचा लळा लागला होता. तो सर्व कामांमध्ये त्यांची मदत करत असे. मात्र काही दिवसांपासून तो आजारी पडला होता. सायंकाळी उशिरा त्याचे निधन झाले. विशुनदेव यांनी आपल्या घोड्याला वचन दिलं होतं की, मृत्यूनंतर तुझी वाजत गाजत अंत्ययात्रा काढेन.
जंगलातला मेवा आला बाजारात, या व्याधीवर आहे रामबाण तोडगा PHOTOS
आपलं वचन पाळत त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात घोड्याला अखेरचा निरोप दिला. या अंत्ययात्रेत केवळ तेच नाहीत तर अख्खा गाव सामील झाला होता. घोड्याच्या निधनाने पूर्ण गाव हळहळला. विशुनदेव यांनी आपल्या मूळगावी विष्णूपूर येथे बुलडोझरच्या साहाय्याने खड्डा खणून त्यात घोड्याला दफन केले. ‘माझा घोडा सुसंस्कृत आणि प्रचंड आज्ञाधारक होता. त्याने मला खूप साथ दिली’, अशा भावना विशुनदेव यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.