चित्रपट, टीव्हीसंबंधी माहिती देणारा जगातील सर्वात लोकप्रिय आणि अधिकृत स्रोत आयएमडीबीने आज एक घोषणा केली आहे. ही घोषणा माधुरी दीक्षितच्या ‘द फेम गेम’ या वेबसीरिजबद्दल आहे. आयएमडीबीने सांगितले की, ३ जानेवारी ते १४ मार्च दरम्यानच्या डेटानुसार ही सीरिज वर्षभरातील भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. जागतिक क्रमवारीत ही सीरिज ६२व्या क्रमांकावर आहे. तसेच आयएमडीबीच्या सर्वाधिक रेटिंग्स मिळवणाऱ्या वेबसीरिजमध्ये या सीरिजने ३४वा क्रमांक मिळवला आहे.
‘द फेम गेम’ ही सीरिज भारत, युनायटेड किंगडम, बांगलादेश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रेक्षकांच्या पेजव्ह्यूजवर आधारित सर्वात लोकप्रिय सीरिज ठरली आहे. या सीरिजमध्ये स्टारडमच्या झगमगाटामागील वास्तव, अभिनेत्री हरवल्यावर कुटुंबातील गुपिते आणि भूतकाळातील जखमा हे सर्व अत्यंत सुरेख पद्धतीने टिपण्यात आले आहे.
ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सीरिजमध्ये ‘शोभा त्रिवेदी’ म्हणून पोलिसाची भूमिका पार पाडणारी राजश्री देशपांडे, सीरिजमधील टॉप रँक स्टार म्हणून ट्रेंडमध्ये होती. राजश्री देशपांडेने ‘द फेम गेम’च्या आधी सेक्रेड गेम्स, अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि द स्काय इज पिंक यासारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे.