लखनऊ 16 एप्रिल : ट्रिपल मर्डरची एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात उत्तर प्रदेशच्या आजमगढमधील धांधारी गावातील एका तरुणाने आपल्या घरातील सदस्यांची निर्घृण हत्या केली. कौटुंबिक वादातून या युवकाने आई-वडील आणि 13 वर्षीय बहिणीवर कुऱ्हाडीने वार केले, या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
या घटनेबाबत एसपी अनुराग आर्य यांनी सांगितलं की, कप्तानगंज अंतर्गत असलेल्या धांधारी गावात ही घटना घडली. 20 वर्षीय राजन सिंहने वडील भानू प्रताप सिंह, आई स्मिता सिंह आणि 13 वर्षांच्या बहिणीवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हा करून आरोपी फरार झाला आहे. माहिती मिळताच एसएचओ, सीईओ, अतिरिक्त एसपी घटनास्थळी पोहोचले. आयजींनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे.
फील्ड युनिट आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. तपासासाठी दोन पथकं तयार करण्यात आली आहेत. आरोपीला पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये एसओजी, सर्विलान्सचाही समावेश करण्यात आला आहे. यात दोन CO समाविष्ट आहेत. गावातील काही लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांची सविस्तर चौकशी केली जाईल.
घटनेनंतर पोलिसांसह डीआयजी रेंज, एसपी, अतिरिक्त एसपी, सीओ यांच्यासह श्वानपथक घटनास्थळी पोहोचले. घटनेचा तपास करण्यात येत आहे. या घटनेमागे अनेक कारणं समोर येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.