भटगाव, 21 मे : एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरने रुग्णाला औषधाच्या चिठ्ठीवर चक्क चर्चमध्ये जायला सांगून तिथे तुमच्या आजारावर उपचार होतील असं लिहिलं आहे. छत्तीसगढमध्ये सारंगढ जिल्ह्यातल्या भटगाव इथं हा प्रकार घडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर संतोष टंडन रुग्णांना सरकारी डॉक्टराच्या चिठ्ठीवर चर्चमध्ये जाण्यास सांगत आहेत. तिथे कोणत्याही पैशांशिवाय आरोग्य केंद्रापेक्षा चांगले उपचार होतील आणि दर रविवारी चांगले डॉक्टर उपलब्ध असतात असं म्हटलं आहे.
भटगावमधील महिला कुमारी बाई सहीस उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली गेली होती. त्यांच्या जुन्या गोल्या संपल्या होत्या आणि प्रकृती ठिक होत नव्हती. त्यामुळे पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची भेट त्यांनी घेतली. औषधे लिहून दिल्यानंतर डॉक्टर संतोष टंडनने महिलेला सांगितलं की, तुम्ही चर्चमध्ये जा. आपल्या आरोग्य विभागापेक्षाही चांगले डॉक्टर असतात. तिथे उपचारही मोफत होईल. त्यावर महिलेने कुठे जावं लागेल असं विचारलं. तर डॉक्टरांनी चिठ्ठीवरच चर्च भटगाव आणि रविवार असं लिहून दिलं.
आयुर्वेदिक उपचारासाठी म्हणून घरी आला अन् महाराजाने मुलगी पळवली; बीडमध्ये नेमकं काय घडलं?
महिला चिट्ठी घेऊन आपल्या घराजवळ आली. तिथे एका व्यक्तीला चिठ्ठी दाखवताच त्याने इतर तरुणांना सोबत घेऊन थेट प्राथमिक उपचार केंद्र गाठलं. डॉक्टर संतोष टंडनला चिठ्ठी दाखवून सरकारी डॉक्टरांकडून असा प्रकार कसा काय केला जातोय याबाबत जाब विचारला. गावकऱ्यांनी जाब विचारताच डॉक्टरांनी चूक मान्य करत माफी मागितली. तसंच पुन्हा अशी चूक होणार नाही असंही म्हटलं.
महिलेच्या गावकऱ्यांनी म्हटलं की, प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा प्रकारे चिठ्ठी देऊन किती गरीब गावकऱ्यांना मोफत उपचार आणि इतर प्रलोभने दाखवून चर्चमध्ये पाठवलं असेल माहिती नाही. हे खूपच संशयास्पद आहे. याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.
सारंगढ बिलाईगढ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भागवत जैसवाल यांनी म्हटलं की, भटगावमध्ये एका डॉक्टरांकडून आरोग्य केंद्रात चर्चमध्ये जाण्यास सांगितल्याची तक्रार मिळाली आहे. त्यासाठी आम्ही सरकारी डॉक्टरांची चौकशी समिती नेमली आहे. जर या चौकशीत डॉक्टर दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.