चेन्नई, 25 मे : चेन्नई सुपर किंग्जने आय़पीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर 1 मध्ये त्यांनी गुजरातला हरवलं होतं. मात्र या सामन्यात धोनीने असं काही केलं होतं ज्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तो फायनलमधून बाहेर होण्याचा धोकाही आहे. धोनीने गुजरातविरुद्ध क्वालिफायरमध्ये असं काय केलं ज्यावरून सध्या वाद सुरू आहे.
धोनीवरून जो वाद सुरू आहे त्याचं कारण संघाचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना आहे.
गुजरातविरुद्ध क्वालिफायर 1 मध्ये मथीशा दुखापतीमुळे मैदानावरून 8 मिनिटांपेक्षा अधिक काळ बाहेर होता. जेव्हा तो परतला तेव्हा धोनीने त्याला दुसरं षटक टाकण्यासाठी दिलं. गुजरातच्या डावातलं हे 16 वं षटक होतं. यावेळी पथिराना त्याचं दुसरं षटक टाकत होता. यावरून वाद सुरू झाला. काही मिनिटं धोनी आणि पंच यांच्यात वाद सुरू होता आणि तोपर्यंत सामना थांबला होता. शेवटी पथिरानाने 16 वे षटक टाकले. धोनीची ही खेळी यशस्वी ठरली पण माजी दिग्गजांनी धोनीसह पंचांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला.
लखनऊच्या पराभवानंतर नवीन उल हक झाला ट्रोल, झोमॅटोने केली आंब्याची पोस्ट
आयपीएलच्या प्लेइंग कंडिशननुसार एक खेळाडू जो दुखापतीमुळे उपचारासाठी मैदान सोडतो किंवा कोणत्याही कारणामुळे 8 मिनिटांपेक्षा जास्त काळ मैदानाबाहेर राहतो त्याला गोलंदाजीला परवानगी मिळण्याआधी तेवढाच काळ मैदानावर रहावं लागतं. मथीशा पथिराना गुजरातच्या डावातलं 12 वं षटक टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला होता. तो परतला तेव्हा धोनीने त्याला 16 वे षटक टाकण्यास दिलं. तेव्हा गुजरातच्या 6 बाद 102 धावा झाल्या होत्या आणि गुजरातला विजयासाठी 71 धावांची गरज होती.
धोनी फिल्डिंग लावत असताना पंच अनिल चौधरी यांनी मथीशा पथिरानासोबत चर्चा केली. धोनी त्याचवेळी ख्रिस गॅफनी यांच्याकडे गेला आणि माहिती घेतली की पंचांनी पथिरानाशी काय चर्चा केली. यावेळी कमेंटेटर्सनी सांगितलं की, पथिराना जवळपास 9 मिनिटे मैदानाबाहेर होता. त्यामुळे तो गोलंदाजी करू शकतो की नाही यावर चर्चा होत आहे.
IPL 2023 : मुंबई इंडियन्स फायनलला येऊ नये; CSKच्या गोलंदाजी प्रशिक्षकाला वाटते भीती
धोनीला सामन्याचे अधिकारी आणि पंचांनी नियमानुसार पथिरानाला गोलंदाजीसाठी काही वेळ वाट बघावी लागेल असं सांगितलं होतं. पण धोनीने पथिरानाला गोलंदाजी देण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. कारण दीपक चाहर, रविंद्र जडेजा आणि महिश तिक्षणा यांची चार षटके झाली आहेत. या चर्चेवेळी सामना थांबला आणि 4 ते 5 मिनिटांचा वेळ निघून गेला. यानंतर पथिरानाला गोलंदाजीसाठी परवानगी दिली गेली आणि धोनीचं काम झालं. पथिरानाच्या दुसऱ्या षटकात 13 धावा निघाल्या आणि पुढच्या षटकात विजय शंकर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने पंचांवर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की, धोनीने त्याच्या उपस्थितीचा पूर्ण फायदा घेतला आणि 4 मिनिटांपर्यंत पंचांना बोलण्यात गुंतवलं. ज्यामुळे पथिरानाला 16 वे षटक टाकता येईल. पंचांनी परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात ठेवायला हवी होती पण ते हसत होते, जे योग्य नव्हतं.
दरम्यान, पंचांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहे. पंचांनी खेळाच्या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्जला शिक्षा देण्याबद्दल विचार केला का? त्यांनी क्षेत्ररक्षणावेळी वेळ वाया घालवला. याबाबत नियमानुसार जर जाणीवपूर्वक वेळ वाया घालवला जातोय असं वाटत असेल तर पंचांनी फिल्डिंग करणाऱ्या संघाला पहिली आणि शेवटची वॉर्निंग द्यायची असते. दुसऱ्यांदा असं झाल्यास संघावर पाच धावांची पेनल्टी लावली जाते. तसंच गोलंदाजालाही सस्पेंड केलं जातं. नियमाचं उल्लंघन झालं की नाही हे पंच ठरवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.