मुंबई, 20 मे : महेंद्र सिंह धोनी यंदाच्या आयपीएलनंतर निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा आयपीएल सुरू होण्याआधीपासूनच होत आहेत. यात त्यानेही मी नाही तर तुम्हीच मी रिटायर होणार असल्याचं ठरवून टाकलं असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आता माजी दिग्गज क्रिकेटपटूने मोठं वक्तव्य केलं आहे. धोनी एक-दोन नव्हे तर पाच वर्षे आयपीएल खेळू शकतो असं म्हटलं आहे.
आयपीएलच्या एका नियमाचा दाखला देत हे वक्तव्य केलं आहे. भारताचा माजी क्रिकेटर युसुफ पठाणने असं वक्तव्य केलं आहे. तो धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ चा टी२० वर्ल्ड कप खेळला होता आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची खेळी साकारली होती.
चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांचा लीग फेरीतील अखेरचा सामना असेल. चेन्नई या सामन्यात जिंकल्यास त्यांचे प्लेऑफमध्ये तिकिट निश्चित होईल. या सामन्याबाबत बोलताना युसूफ पठाणना म्हटलं की,”धोनी अजून पाच वर्षे खेळू शकतो.” सध्या धोनीचे वय 41 असून वयाच्या 46 व्या वर्षापर्यंत तो कसा खेळू शकतो असा प्रश्न सर्वांनाच पडला.
IPL 2023 : यशस्वीचा धमाका! ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा 15 वर्षे जुना विक्रम मोडला
युसूफ पठाणने म्हटलं की, यंदाच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू झाला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की धोनीला पाच वर्षे आणखी खेळण्यासाठी काही अडचण येईल. तो अजुनही चौकार षटकार मारतो.
धोनी पुढच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना कदाचित दिसणार नाही. पण एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानात उतरू शकतो. अशा पद्धतीने तो संघासोबत राहील आणि मेंटॉरप्रमाणे नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघ तयार करण्याचं काम करेल. त्यामुळे धोनी आता निवृत्ती घेईल यावर विचार करू नका. त्याच्यात अजून बरंच क्रिकेट आहे. गुडघ्याला दुखापत झाल्यानतंरही तो चेंडू सहज टोलावतोय यावरून त्याचा अंदाज लावता येईल असंही पठाण म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.