मुंबई, 23 एप्रिल: इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर हे पद प्रतिष्ठेचं असतं. या पदावर नोकरी करणाऱ्यांना चांगलं वेतन मिळतं. त्याशिवाय काही सुविधाही दिल्या जातात. तुम्हालाही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनायचं असेल, तर या गोष्टी जाणून घ्या. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचं पद हे SSC CGL उमेदवारांपैकी सर्वांत प्रतिष्ठेचं असतं. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर होणं अभिमानाचं असतं, जबाबदारी असते आणि या पदाचं वेतनही चांगलं असतं. SSC CGL परीक्षेद्वारे मिळणारं हे सगळ्यात प्रमुख पद असतं. आयकर विभाग ही करसंकलन व निरीक्षण करणारी प्रमुख संस्था असते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामध्ये SSC CGL इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर हे पद विशिष्ट ग्रुप सी दर्जाचं पद असतं. SSC CGL परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये या पदाला अधिक मागणी असते. या पदावर नोकरी करायची इच्छा असेल, तर या गोष्टींकडे लक्ष द्या.
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरला सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळतं. भारत सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामध्ये हे उमेदवार नोकरी करतात.
पे लेव्हल पे लेव्हल 7 (44,900 रु. ते 1,42,900 रु.)
ग्रेड पे 4600 रुपये
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचे भत्ते व इतर लाभ
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरला वेतनाशिवाय आणखीही काही भत्ते व सुविधा मिळतात.
केंद्र सरकारची आरोग्य योजना – CGHS कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष आरोग्य योजना असते. अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी औषधोपचारांनुसार वेलनेस सेंटर किंव पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून तपासणी सुविधा दिली जाते.
वाहतूक भत्ता – कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित प्रवासासाठी सरकारकडून एक निश्चित रक्कम दिली जाते.
हाउस रेंट अलाउन्स (HRA) – घर भाड्याने घेण्यासाठी जो खर्च येतो, त्यासाठी सरकारकडून ही रक्कम दिली जाते.
पेन्शन – सेवानिवृत्तीचं अधिकृत वय किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना, तसंच काही विधवा व अपंगांना प्राधिकरण/ मंत्रालयाकडून नियमितपणे हे पैसे दिले जातात.
केंद्र सरकारी कर्मचारी समूह विमा योजना – या योजनेतून 2 फायदे मिळतात. कुटुंबीयांसाठी विमा संरक्षण व निवृत्तीच्या वेळी काही देय रक्कम असे दोन फायदे यातून मिळतात.
महागाई भत्ता – मूळ पगाराच्या ठरावीक टक्के हा भत्ता दिला जातो. महागाईचा परिणाम कमी करसाठी याने मदत होते.
या सर्व भत्त्यांमध्ये शहरांनुसार कमी-अधिक फरक पडतो.
कामाचं स्वरूप
प्रामुख्याने व्यक्ती, कंपन्या किंवा भागिदारी संस्था यांनी जो आयकर भरणं आवश्यक असतं, त्याचं मूल्यांकन करण्याचं काम इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरचं असतं. त्यांना रिफंड क्लेम आणि टीडीएसबाबतचे प्रश्न हाताळावे लागतात. हे उमेदवार धाड टाकणाऱ्या क्विक रिस्पॉन्स टीमचा भाग बनू शकतात. ज्या इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरना नॉन असेसमेंट काम दिलं जातं, त्यांना सहसा फक्त कारकुनी कामकाज करावं लागतं.
करिअरच्या संधी आणि बढती
या पदावरच्या उमेदवारांना बढती मिळण्याची संधी असते. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून 10-11 वर्षं सेवा केल्यावर असिस्टंट कमिशनर या पदावर बढती दिली जाते. या पदावर 4-5 वर्षं काम केल्यावर डेप्युटी कमिशनर म्हणून बढती मिळते. त्यानंतर जॉइंट कमिशनर व शेवटी इन्कम टॅक्स अॅडिशनल कमिशनर या पदापर्यंत जाता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.