कोल्हापूर, 27 एप्रिल : महाराष्ट्रात ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवारी पारपडली. दिपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फ़ंड हिने ही स्पर्धा जिंकली आहे. परंतु कुस्ती स्पर्धेच्या निकालानंतर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.
भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थाई समितीच्या परवानगीने आणि दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूरातील ऐतिहासिक खासबाग मैदानावर ही स्पर्धा पारपडली असून यात अहमदनगरच्या भाग्यश्री फ़ंडने कोल्हापूरच्या अमृता पुजारीचा पराभव करून मानाची गदा पटकावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेती पैलवान भाग्यश्री फ़ंड हिला मानाची गदा आणि बक्षीस म्हणून चार चाकी गाडी देण्यात आली.
परंतु या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग्यश्री फ़ंड हिला पंचानी विजयी घोषित करताच स्पर्धेच्या ठिकाणी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. भाग्यश्री फ़ंडच्या विजयानंतर पंचांच्या निर्णयावर पराभूत झालेल्या पैलवानाच्या कोच आणि पालकांनी ही स्पर्धा पूर्णपणे मॅनेज केलेली असल्याचा आरोप केला. पराभूत झालेल्या अमृता पुजारीच्या कोचनी स्पर्धेचा वजन गट सुद्धा मॅनेज केल्याचे आरोप केला. यानंतर मैदानावर आयोजक आणि पराभूत झालेल्या अमृता पुजारीच्या पालकांमध्ये प्रचंड वादावादी झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.