इस्लामाबाद, 20 एप्रिल : गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण आहेत. यातच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने गुरुवारी सांगितले की, त्यांचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीत सहभागी होण्यासाठी येत असल्याचे पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज बलोच यांनी साप्ताहिक मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, बिलावल भुट्टो झरदारी हे 4-5 मे रोजी गोव्यात होणाऱ्या SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत (CFM) पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. तर झरदारी याचा भारत दौरा हा 2014 मध्ये नवाझ शरीफ यांच्यानंतर पाकिस्तानी नेत्याचा पहिलाच भारत दौरा असेल.
फेब्रुवारी 2019 मध्ये, पुलवामा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले. भारताने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष अधिकार मागे घेण्याची आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर हे संबंध आणखीनच बिघडले.
मोदींवर केली होती विवादित टिप्पणी –
बिलावल झरदारी भुट्टो यांनी डिसेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ला करताना, पाकिस्तानचे मंत्री म्हणाले, “मी भारताला सांगू इच्छितो की ओसामा बिन लादेन मेला आहे, परंतु ‘गुजरातचा कसाई’ अजूनही जिवंत आहे आणि भारताचा पंतप्रधान आहे. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिकेने त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली होती,” असे ते म्हणाले होते.
SCO काय आहे?
SCO हा एक प्रादेशिक राजकीय आणि सुरक्षा गट आहे, ज्याच्या सदस्यांमध्ये रशिया, चीन, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. गोव्यात परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. भारत 9 जून 2017 रोजी SCO चा पूर्ण सदस्य झाला. यात अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया सारखी चार आब्जर्वर स्टेट आहेत आणि आर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्की हे सहा डायलाग पार्टनर आहेत.
आठ सदस्यीय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही एक प्रमुख प्रादेशिक महासत्ता आहे, जी दोन दशकांपूर्वी तिच्या सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक, राजकीय आणि लष्करी सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती. ही संघटना जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 42 टक्के आणि जागतिक जीडीपीच्या 25 टक्के प्रतिनिधित्व करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.