चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 21 फेब्रुवारी : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला अखेर भाजपने पक्षात रितसर प्रवेश दिला आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडच्या संपर्क कार्यालयातच हा वादग्रस्त पक्षप्रवेश झाला. या पक्ष प्रवेशावर अजित पवारांनी टीका केलीय तर बावनकुळेंनी त्याचं धडधडीत समर्थन केलं आहे..
तुमच्या शहरातून (पुणे)
सुसंस्कृत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. दोन वर्षांपूर्वीही स्वाती मोहोळ यांना भाजपात घेण्याचा प्रयत्न झाला होता पण टीका होताच चंद्रकांत पाटलांनी हाथ झटकले होते. यावेळी मात्र, त्याच चंद्रकांत पाटलांनी एका गुंडाच्या पत्नीला रितसर पक्षप्रवेश दिला. त्यामुळे गुंड शरद मोहोळ पुण्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेला आला.
शरद मोहोळची गुन्हेगारी पार्श्वभूमी
– हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे 15 गुन्हे नोंद आहेत.
– विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या तो या प्रकरणात जामिनावर आहे.
– २०२१ साली दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले होते. या गुन्ह्यातही त्याला अटक झाली होती
– याच अटकेदरम्यान, शरद मोहोळनं येरवडा कारागृहात अतिरेकी कातील सिद्दीकीचा खून गळा आवळून खून केल्याचा आरोप
– मागील वर्षी मात्र, शरद मोहोळची जामिनावर सुटका
– जेलमधून बाहेर येताच मोहोळकडून गुन्हेगारी कृत्यांना पुन्हा सुरूवात
– खंडणीसाठी धमकावल्याबद्दल पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– त्यानंतर जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं
अशा गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुंडाच्या पत्नीला भाजपने पक्षात घेतलं तर विरोधी पक्ष त्यावर टीका ही करणारच…अजित पवारांनी तर आता जनतेनेच याबाबत निर्णय घ्यावा असं म्हटलंय.
मधल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आणि पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ज्या मुख्यमंत्र्यांना मोहोळ सोबतचा फोटोही खटकला त्या मोहोळच्या पत्नीला भाजपने मात्र, रितसर पक्षात प्रवेश दिला आणि वरून पतीच्या कृत्यांची शिक्षा पत्नीला का द्यायची? असा प्रतिप्रश्नही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
(जन्मदात्या बापालाच काढलं घराबाहेर? राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल)
स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळने स्वतःच्या पत्नीच्या मार्फत राजकारणात उतरायचं ठरवलंय. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचे कार्यक्षेत्र कोथरूड परिसरात आहे. त्यामुळे कोथरुडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील आणि नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शरद मोहोळचा राजकीय फायदा होणार हे उघड आहे. किंबहुना त्यासाठीच हा पक्ष प्रवेश झाला आहे पण यातून होणाऱ्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचं काय ? याचं उत्तर मात्र कोणताच राजकीय पक्ष देताना दिसत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.