मुंबई, 29 एप्रिल : उत्पादनाबाबतीत कोणाताही नवीन प्रयोग करणं, त्यासाठी पुढाकार घेणं या गोष्टी कोणत्याही ऑटोमोटिव्ह उत्पादकासाठी सोपं नाही. असे निर्णय किती धोकादायक ठरू शकतात, हे शब्दांत मांडणे कठीण आहे. मात्र एमजी मोटर कंपनीने एक नवीन पाऊल उचललं आहे. या कंपनीने संशोधन करत भारतीय बाजारपेठेने या पूर्वी कधीही न पाहिलेली आणि न ऐकलेली एक 4 सीटर (लहान) इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. निःसंशयपणे या कंपनीने आधुनिक काळातील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत भारतात नाविन्यपूर्ण कॉमेट ईव्ही लाँच केली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे, एमजी कॉमेट ईव्ही ही दोन दरवाजे असलेली चार सीटर इलेक्ट्रिक कार आहे. ही कार विशेषतः शहरातंर्गत प्रवासाच्या दृष्टीकोनातून तयार केली आहे, असं कंपनीने अनेकदा पत्रकार परिषदांमध्ये स्पष्ट केलं आहे. आधुनिक काळातील तरुण ग्राहक म्हणजेच GenZ चा स्वॅग लक्षात घेऊन ही कार डिझाईन करण्यात आली आहे. एमजी कॉमेट ईव्हीची प्रारंभिक किंमत 7.98 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही कार एका चार्जवर 230 किमीची रेंज देऊ शकते, असा दावा एमजी कंपनीने केला आहे.
अलीकडेच, आम्हाला दिल्लीच्या रस्त्यावर एमजी कॉमेट ईव्हीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली. आम्ही कँडी व्हाईट रंगाची लहान ईव्ही ड्राइव्ह केली. दिल्लीतील रस्त्यावर ही कार चालवताना नागरिकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. एमजी कॉमेटची रचना, आतील गुणवत्ता, फीचर्स, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, सुरक्षितता, परफॉर्मन्स याबद्दल आम्हाला काय वाटतं ते सविस्तरपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार विषयीची माहिती जाणून घेऊया.
एमजी कॉमेट ईव्ही डिझाईन :
एमजी कॉमेट ईव्ही कारचा लूक खरोखर सुंदर आहे. एमजी कॉमेट ईव्ही कारची एकूण लांबी 2974 मिमी,रुंदी 1505 मिमी आहे. ही कार 2010 मिमीच्या व्हीलबेससह येते. कॉमेट कारच्या चाकांना 12 इंचाचे स्टीलचे आवरण आहे. डिझाईनविषयी बोलायचं झालं तर कारचं पेंटवर्क तुमचं लक्ष वेधून घेतं. ही कार कँडी व्हाइट, ऑरोरा सिल्व्हर आणि स्टेरी ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये उपलब्ध आहे. तसेच ही कार अॅपल ग्रीन आणि स्टेरी ब्लॅक, कँडी व्हाइट आणि स्टेरी ब्लॅक अशा दोन ड्युअल टोनमध्ये उपलब्ध आहे. शिवाय ग्राहकांना कॉमेट LIT पॅकच्या मदतीने चार वेगवेगळ्या रंगांचे पर्याय निवडता येऊ शकतात. सर्वात खास बाब म्हणजे या कारचा लोगो अगदी स्पष्ट दिसतो. यात आधुनिक समांतर स्टेप्सचे एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प आहेत. हे गर्दीतही वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेऊ शकतात. शिवाय चालू ट्रेंडनुसार समोर आणि मागील बाजूला जोडलेले दिवे या कारमध्ये आहेत. ही कार बाजूने कॉम्पॅक्ट दिसते. मागील प्रवाशांसाठी थ्री डोअर डिझाईन आणि एरो क्राफ्ट विंडो देण्यात आल्या आहेत. नवीन एमजी कॉमेट कारचा टॉप व्हेरियंट अनोख्या फिजेट स्पिनर सारख्या अवतारात लाँच केला आहे. एकूणच एमजी कॉमेटची बाह्य रचना अद्वितीय आणि लक्षवेधी आहे.
एमजी कॉमेट ईव्ही केबिन आणि फीचर्स :
एमजी कॉमेट ईव्हीच्या केबिनमध्ये प्रवेश करताच तुम्ही तिचे बाह्य स्वरुप विसरुन जाल. कारचे ड्युअल टोन स्पेस ग्रे इंटीरियर नेत्रसुखद आहे. थीन ब्राइट फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले तुम्हाला लक्झरी सेडानची आठवण करून देतात. कारमध्ये लॅपटॉप आणि फोनसाठी पुरेशी स्मार्ट स्टोरेज स्पेस आहे. मात्र यात ग्लोव्हज बॉक्स नाही. ही कार टू डोअर असल्याने मागील सीटवर बसणाऱ्यांना आत किंवा बाहेर जाणं अत्यंत सोपं आहे. वन टच स्लाइड आणि रिक्लायनिंग फ्रंट पॅसेंजर सीटची प्रोसेस स्मूथ आहे. त्यामुळे आकार कॉम्पॅक्ट असला तरी चार तरुण आरामात प्रवास करू शकतात. एमजी कारच्या इतर मॉडेल्सप्रमाणे कॉमेट ईव्हीत दर्जेदार तंत्रज्ञान आणि आरामदायी फीचर्स देण्यात आली आहेत.
कॉमेट ईव्हीमध्ये फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमसह अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले आणि 100 हून अधिक व्हॉइस कमांडचा समावेश आहे. यात 55पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स आहेत. या शिवाय दोन स्पीकर, तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट चार्ज करण्यासाठी तीन फास्ट यूएसबी पोर्ट कारमध्ये आहेत. कंपनीने समोरच्या बाजूला 12V चे चार्जिंग आउटलेट दिले आहे. तसेच तुम्हाला की-शेअरिंग फंक्शनसह एक डिजिटल कीदेखील मिळेल. लेदर रॅप्ड स्टिअरिंग व्हील, डोअर ट्रिमवर पीव्हीसी लेअरिंग, फॅब्रिक सीट अपहोल्ट्री आणि मागील 50:50 स्प्लिट सीट हे कारमधले काही खास फीचर्स आहेत. दर्जेदार प्लॅस्टिकमुळे केबिन दोन सेंगमेंट उंच असलेल्या कारशी सहज स्पर्धा करेल असं आम्हाला वाटतं.
एमजी कॉमेट सेफ्टी फीचर्स :
या कारची बांधणी 17 हॉट स्टॅपिंग पॅनेलसह उच्च ताकदीच्या स्टील बॉडीवर करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स असे प्रमुख सुरक्षा फीचर्स आहेत.
ईव्ही वाहनांमध्ये बॅटरी अत्यंत महत्वाची असते. या कारमध्ये IP-67 रेटिंग असलेली बॅटरी आहे. ती धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करते. या कारच्या बॅटरीच्या 39 कडक सुरक्षा चाचण्या केल्या आहेत. त्यात फायर टेस्ट, थर्मल डिफ्युजन आणि फ्लिप टेस्टचा समावेश आहे. या चाचण्या कार लाँच करण्यापूर्वी करण्यात आल्या आहेत. शहराच्या परिस्थितीचा विचार करता या लहान हॅचमध्ये पुरेसे सिक्युरिटी फीचर्स आहेत. मात्र या कारचा दरवाजा बंद होताना मोठा आवाज येतो.
एमजी कॉमेट ईव्ही परफॉर्मन्स आणि रेंज :
एमजी कॉमेट ईव्हीत 17.3 kWh चे लिथियम आयनचे बॅटरी पॅक आहे.हे पॅक प्रिझमॅटिक सेल्सपासून तयार केले आहे. हे बॅटरी पॅक 41bhp ची टॉप पॉवर आणि 110 Nm चा पीक टॉर्क निर्माण करतो. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्टस असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. कारचे पॉवर आउटपुट रेखीव आणि पुरेसे आहे. बॅटरी 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे सात तास लागतात. तुम्ही ही कार कोणत्याही 16AMP सॉकेटने किंवा खरेदीवेळी ब्रँडने दिलेल्या होम चार्जरद्वारे चार्ज करू शकता. ही कार एका चार्जवर 230 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे.
एमजी कॉमेट ईव्हीची ड्रायव्हॅबिलीटी आणि हाताळणी :
रहदारीत ही कार चालवणे मजेदार आहे. कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे ती रहदारीतून लवकर बाहेर पडू शकते. या कारचा टॉप स्पीड 100 kmph पर्यंत मर्यादित आहे. कारच्या फ्रंटला डिस्क ब्रेक आणि रिअर साइडला ड्रम ब्रेक आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.एका छोट्या हॅचमध्ये समोर मॅकफेर्सन स्ट्रट सस्पेंशन आणि मागील बाजूला मल्टी लिंक कॉइल सस्पेंशन आहे. भारतीय रस्त्यांचा विचार करून हे सस्पेंशन देण्यात आले आहे.
एमजी कॉमेट ईव्हीबाबतचा निकाल :
नवीन एमजी कॉमेटने भारतातील सर्वांत परवडणारी इलेक्ट्रिक कार म्हणून एक बेंचमार्क सेट केला आहे. पूर्वी आम्ही या कारची किंमत 10 ते 12 लाखांच्या घरात असेल असे गृहीत धरलं होतं; पण प्रत्यक्षात हा अंदाज खोटा ठरला. स्टायलिश डिझाईन, उच्च तंत्रज्ञान, आरामदायी केबिन, 230 किमीची श्रेणी, 1000 किमीसाठी 519 रुपयांचा मासिक चार्जिंग खर्च या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रोजच्या सिटी ड्राइव्हसाठी आणि ज्यांना कॉलेजला किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आरामदायी प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी ही कार योग्य आहे. ही कार ईव्ही क्रांतीला बळ देईल. शहरातील तरुण ग्राहकांचा तिला चांगला प्रतिसाद मिळेल. रोजची आणि घरगुती कामांसाठी ही कार योग्य आहे, असं आम्हाला वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.