तेलंगणा, 14 एप्रिल : राज्यात एकीकडे ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे, राज्यात बीआरसीने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. अशातच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
प्रकाश आंबेडकर हे हैदराबादमध्ये दाखल झाले असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची त्यांनी भेट घेतली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंचीच्या पुतळ्याच्या लोकार्पण काही वेळातच हैदराबाद मध्ये होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर हैदराबादमध्ये आले असले तरी के चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून महाराष्ट्रात पुढील निवडणुका समोर ठेवून या राजकीय घडामोडी सुरू आहे. ते पाहता प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
(ऐन उन्हाळ्यात तापले राजकीय वातावरण, या नेत्यांची विधानं देत आहे भूकंपाचे संकेत)
प्रकाश आंबेडकर हैदराबादमध्ये दाखल झाल्यानंतर भारत राष्ट्र समितीच्या सगळ्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांचे जोरदार स्वागत केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून प्रकाश आंबेडकर यांना के चंद्रशेखर यांनी आमंत्रित केले आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती केली आहे. सेनेसोबत युती झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने वंचित आघाडीला अजून स्वीकारलेलं नाही. त्यामुळे वाद अजून कायम आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.